Raver Lok Sabha : भाजपने रावेर लोकसभा मतदार संघात खासदार रक्षा खडसे तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून एकनाथ खडसे किंवा रक्षा खडसेंच्या भावजय रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होत होती. दरम्यान, रावेरमध्ये खडसे विरोधात खडसे लढत होणार का ? यावर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले एकनाथ खडसे ?
रावेर लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित पार पडली. रावेर लोकसभा मतदार संघात महायुतीकडून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे हा मतदार संघ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला आला असून या मतदार संघात कोणता उमेदवार द्यायचा यासंदर्भात ही महत्वाची बैठक होती. या बैठकीसाठी एकनाथ खडसे, रोहिणी खडसे, माजी आमदार संतोष चौधरी, रवींद्र पाटील उपस्थित होते. या बैठकीनंतर एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना रावेरमध्ये खडसेविरुद्ध खडसे लढत होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.