जळगाव : मित्र पक्षांनी रावेर लोकसभा मतदार संघावर दावा केला असल्याच्या प्रश्नावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी काँग्रेसची भुमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी मित्र पक्षांवर अप्रत्यक्ष टीकाही केली. नाना पटोले म्हणाले की, कुणाला काहीही मागणी करु द्या, कोणत्याच मागणीला गांभीर्यांने घेण्याची आवश्यकता नाही. रावेर लोकसभा मतदार संघाचा निर्णय मेरिटवर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलतांना नाना पटोले म्हणाले की, देशात महागाई वाढली आहे. बेरोजगारांच्या आत्महत्या सुरु आहेत. तरुण पिढी बरबाद होऊ नये यासाठी सरकारने ठोस भुमिका घ्यावी. मात्र मुठभर लोकांना श्रीमंत करण्याचे काम सुरु आहे, असा आरोपही त्यांनी केला. जरांगे पाटलांनंतर नागपुरला ओबीसीचे आरक्षण सुरु झाले तेव्हा फडणवीसानी त्यांना आश्वासन दिले होते. पण ते अजूनही पूर्ण झाले नाही. भाजपला आरक्षण व्यवस्था संपवायची आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
या मातीने कॉंग्रेसला मोठे नेते दिले आहे राष्ट्रपतीपद भुषविले आहे. या मातीत कॉंग्रेसचा सुगंध आहे. उतारचढाव सगळ्यांच्या जीवनात आहे. जागांच्या वादात आम्हाला जायचे नाही, भाजपाविरोधी आमची लढाई आहे. कार्यकर्ताना शक्ती देण्यासाठी मी इथे आलोय, असेही ते म्हणाले. विविध मागण्यांसाठी येत्या १५ दिवसात तालुकानिहाय आंदोलन आणि जिल्हा आंदोलन करणार, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. पत्रकार परिषदेला काँग्रसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील उपस्थित होते.