तरुण भारत लाईव्ह | तुषार महाजन, रावेर : रावेर-पाल या २५ कि.मी. अंतराच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे. वारंवार तक्रारी केल्यानंतरही संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी याबाबत दखल घेण्यास तयार नसल्याने रस्त्यांवर अपघाताची मालिका कायम आहे.हा रस्ता दिवसेंदिवस एका बाजूला अधिकच खचत जात असल्याने खड्ड्यांचा आकार वाढला आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने किमान अप्रिय घटना घडण्यापूर्वीच डागडूजी व नंतर डांबरीकरण होण्याची वाहनधारकांसह नागरीकांना अपेक्षा आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेवून वाहने हाकावी लागत असल्याने आमदार शिरीष चौधरींनी दखल घेण्याची अपेक्षा आहे.
मोठ्या अपघातापूर्वीच घ्यावी दखल
गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याची वाताहत झाली असताना लोकप्रतिनिधी व संबंधित विभाग कुठलीही दखल घेत नसल्याने वाहनधारकांच्या संतापात अधिकच भर पडली आहे. काही प्रमाणात या रस्ता दिसून येत असलातरी झालेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून मूळ रस्त्यापासून टाकण्यात आलेला लेयर (थर) एक इंचाचादेखील नाही. कुसुंबा-सहस्त्रलिंग दरम्यानचा रस्ता खड्ड्यांनी भरला आहे. वेळीच रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास मोठा अपघात होण्याची भीती आहे. पाल येथे अध्यात्मिक क्षेत्र वृंदावन धाम असल्याने अनेक राज्या-परराज्यातील भाविक येथे नियमित येतात मात्र खराब रस्त्यांमुळे भाविकांनाही प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे.
थोड्याच दिवसातच श्रावण महिन्याला सुरूवात होणार आहे. पालपासून थोड्या अंतरावर शिरवेल महादेव, शिव गुफा तसेच अनेक महादेवांचे मंदिर आहेत त्यामुळे अनेक शिवभक्त नियमित ये-जा करतात. महाराष्ट्रातील सर्व भाविकांना जाण्यासाठी रावेर-पाल हाच रस्ता आहे व त्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय असल्याने किमान तात्पुरता या रस्त्याची डागडूजी करावी व पावसाळ्यानंतर डांबरीकरणाची अपेक्षा आहे.
पाल ग्रामस्थांनाही खराब रस्त्यामुळे मनस्ताप
पाल हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते शिवाय हरीण पैदास केंद्र, कृषी विद्यापीठ उद्यान केंद्र, डोंगराळ भाग, नदी, बंधारे, पाझर तलाव, मोठमोठे पाण्याचे डॅम आदींमुळे पर्यटकांसाठी पाल हे नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे मात्र रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट असल्याने पर्यटकांनाही मोठा त्रास सोसत पाल गाठावे लागत असल्याने किरकोळ अपघातांसह वाहने नादुरुस्त होण्याचा मनस्ताप सोसावा लागत आहे. पाल गावात राहणार्या नागरीकांना रात्री बे रात्री आरोग्याची समस्या उद्भवल्यास त्यांना तत्काळ रावेर गाठणे अशक्य आहे शिवाय ही बाब वेळ-प्रसंगी जीवावरही बेतण्याची भीती आहे. आमदार शिरीष चौधरींनी लक्ष घालावे, अशी अपेक्षा आहे.