क्रिकेट : भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. भारतीय क्रिकेट संघाने सुरुवातीचे दोन्ही कसोटी सामने जिंकून 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. तर मालिकेतील तिसरा कसोटी सामना येत्या 1 मार्चपासून सुरू होणार आहे.
काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने उर्वरित 2 कसोटी सांमन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. तर केएल राहुलला उपकर्णधार पदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. आता भारतीय संघाचा पुढील उपकर्णधार कोण? असा प्रश्न उपस्थित होत असताना माजी भारतीय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले शास्त्री?
मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकांमध्ये उपकर्णधारपद काढून टाकलं पाहिजे. कारण संघाचा उपकर्णधार फॉर्ममध्ये नसेल तर याचा संघावर वाईट परिणाम पडतो. भारतीय संघाने उपकर्णधार बनवू नये. जर सामन्यात एखाद्या वेळेस कर्णधाराला बाहेर जावं लागलं तर त्याच्याऐवजी एखादा खेळाडू त्याची जागा घेऊ शकतो. मायदेशात तर उपकर्णधाराची आवश्यकता नाही. परदेशात खेळताना याबाबत विचार केला जाऊ शकतो.
दरम्यान, केएल राहुल सध्या चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरतोय. अनेकदा संधी मिळूनही त्याला धावा करता येत नाहीये. त्यामुळे त्याला उपकर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आहे. या फ्लॉप कामगिरीनंतर त्याला संघाबाहेर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अनेक दिग्गजांनी केएल राहुलला संघाबाहेर करून शुभमन गिलला संधी देण्याची मागणी केली आहे.