पुणे : पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश महानज यांचं आज निधन झालं. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. बापट यांच्या पार्थिवावर सायंकाळी 7 वाजता नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार केले जातील.
दरम्यान बापट यांच्या निधनाने आज महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांनी हळहळ व्यक्त केली. एक दिलखुलास, सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर देखील गिरीश बापट यांचं खाजगीतलं ते वक्तव्य आठवून करून भावूक झाले, त्यांनी परिवार आणि पक्षाच्या वतीने गिरीश बापट यांना आदरांजली वाहिली.
रवींद्र धंगेकर भावूक, काय म्हणाले?
गिरीश बापट यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया देताना रवींद्र धंगेकर म्हणाले, ‘ गेली ३ दशकं त्यांनी पुणे शहराच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात त्यांनी योगदान दिलं. फक्त पक्षातच नव्हे तर पक्षाच्या बाहेरील लोकांसाठीही ते सत्याच्या बाजूने उभे रहायचे. पक्षात जे चुकीचे वागत होते, त्यांच्याविषयी ते बोलून दाखवत असत. वरिष्ठ म्हणून त्यांच्या शब्दाला आदर होता. आमच्यासारख्यांसाठी ते आदर्श होते.मीसुद्धा त्यांच्याविरोधात दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवली. पण कार्यकर्ता म्हणून ते खाजगीत बोलायचे. रवी कधीतरी आमदार होईल.. अशा प्रकारचं सर्वसमावेशक राजकारण त्यांनी केलंय. अशा चांगल्या माणसाला पुण्यनगरी मुकली आहे. एक दिशा देणारं नेतृत्व गमावलं आहे. परिवार आणि पक्षाच्या वतीने गिरीश बापट यांना आदरांजली वाहतो.