T20 World Cup 2024 Final : बार्बाडोसच्या मैदानावर तब्बल १७ वर्षांनी भारतीय संघाने इतिहास रचला. वर्ल्डकप जिंकल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच कल्ला करण्यात आला. चाहत्यांचा आनंद तर गगनात मावत नव्हता. दरम्यान, टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयानंतर आणि टीम इंडियाला टी 20 वर्ल्डकप चॅम्पियन केल्यानतंर विराट कोहली आणि कॅप्टन रोहित शर्मा यांनी निवृत्तीची घोषणा केली. आता त्यांच्या पाठोपाठ अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने देखील टी 20 क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
विराट कोहलीने विजयानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान बोलताना आपण क्रिकेटच्या या छोट्या फॉर्मेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाच्या खेळाडूंनी विजयाचा जल्लोष करायला सुरुवात केली. एकमेकांनी एकमेकांना गळाभेट देत अभिनंदन केलं. तेव्हा भारतीय खेळाडूंचा कंठ दाटून आला होता, डोळ्यात आनंदाश्रू होते.
मात्र काही वेळाने रोहित शर्मानेही विराट पाठोपाठ टी 20 क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. विराट-रोहितसारखी अनुभवी आणि आजी माजी कर्णधारांची जोडी निवृत्त झाल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. अशातच आता त्यांच्या पाठोपाठ अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने देखील टी 20 क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
रविंद्र जडेजाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली की, ‘माझं ह्रदय कृतज्ञतेनं भरलं आहे. मी आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. एका प्रमाणिकपणे पळणाऱ्या घोड्यासारखं मी देखील माझ्या देशासाठी कायम मी माझं सर्वस्व देण्याचा प्रय्तन केला आणि इतर फॉरमॅटमध्ये मी ते पुढे पण देईन.’
‘टी २० वर्ल्डकप जिंकणं हे स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे. हे माझ्या टी 20 कारकिर्दीचं शिखर आहे. मला दिलेल्या समर्थनासाठी, आठवणींसाठी आणि उत्साहासाठी सर्वांचे आभार.’