RBI कडून रेपो दराबाबत मोठी घोषणा; कर्जावरील ईएमआय वाढला की कमी झाला? वाचा

नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दराबाबत मोठी घोषणा केली असून गेल्या काही वर्षांपासून कर्जाचा हप्ता कमी होण्याची आशा बाळगून असलेल्या ग्राहकांना धक्का दिला. म्हणजेच आरबीआयने आज गुरुवारी सलग आठव्यांदा रेपो दरात कोणताही बदल न करण्याची घोषणा केली. रेपो दर ‘जैसे थे’ ठेवण्यात आल्यामुळे कर्ज स्वस्त आणि ईएमआय कमी होण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.

आरबीआयचा रेपो दर ६.५ टक्के इतकाच राहणार असल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. दास यांनी चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत रेपो दर ‘जैसे थे’ ठेवण्यासाठी ४-२ असं मतदान झालं. रेपो दर ‘जैसे थे’ ठेवण्याला बहुमत मिळालं. आता रेपो दर ‘जैसे थे’ राहिल्याने कर्जदारांना कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळाला नाही.

रेपो दर जाहीर करताना त्यांनी जागतिक संकटाविषयी चिंता व्यक्त केली. चलनविषयक धरोण समितीत एसडीएफ ६.२५ टक्के, एमएसएफ ६.७५ टक्के, रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्के दर कायम ठेवला आहे. तसेच रोख राखीव प्रमाण ४.५० टक्के आणि एसएलआर १८ टक्के ठेवलं आहे.

शक्तिकांत दास पुढे म्हणाले, ‘जगातील स्थिती आव्हानात्मक आहे. काही देश सेंट्रल बँकांच्या व्याजदरात कपात करण्याविषयी विचार करत आहे. तर काही देश व्याजदरात वाढ करण्याचा विचारात आहे. तर भारताच्या रिझर्व्ह बँकेवरही अनेकांची नजर आहे’.

आरबीआयने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये जीडीपी वाढ ७.२ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेत अन्नधान्य महागाई नियंत्रणात ठेवण्याचे रिझर्व्ह बँकेसमोर आव्हान असणार आहे. त्यामुळे त्यांचं लक्ष त्यांच्यावर असणार आहे.