RBI : होमलोन, पर्सनल लोन, व्हेईकल लोन घेणार्‍यांसाठी मोठी बातमी

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरुवारी (६ एप्रिल) आर्थिक वर्ष २०२४ साठी पहिले पतधोरण जाहीर केले. RBI गव्हर्नरने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर ६.५० टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. याआधी आरबीआयने सलग सहा वेळा रेपो दरात वाढ केली होती. अलीकडे फेडरल रिझर्व्ह, युरोपियन सेंट्रल बँक, बँक ऑफ इंग्लंड यासह जगातील सर्व केंद्रीय बँकांनी व्याजदरात वाढ केली आहे.

रेपो रेट हा दर आहे ज्यावर RBI व्यापारी बँका आणि इतर बँकांना कर्ज देते. रेपो दराचा बँकांच्या व्याजदरावर परिणाम होतो. रेपो रेट वाढला की कर्जांचे व्याजदर वाढतात. महागाईच्या संकटात आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करत सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. शक्तिकांता दास म्हणाले की, ग्रामीण भारतामध्ये ग्राहकोपयोगी वस्तू, ट्रॅक्टर विक्री वाढ यासारख्या महत्त्वाच्या निर्देशकांमध्ये वाढ झाली आहे.

मूळ चलनवाढ अजूनही उच्च पातळीवर आहे. डिसेंबर २०२२ पासून किरकोळ महागाई दरात वाढ झाली आहे. फेब्रुवारीच्या बैठकीत RBI च्या चलनविषयक धोरण समितीने व्याजदरात २५ आधार अंकांची वाढ केली होती. यानंतर रेपो दर ६.२५% वरून ६.५०% झाला. या दरम्यान, रिव्हर्स रेपो दर ३.३५% होता. याशिवाय, स्थायी सुविधा दर ६.२५% आणि मार्जिन स्थायी सुविधा दर ६.७५% आहे.