अभिमानास्पद : RBI गव्हर्नर शक्तिकांत दास जगातील सर्वोत्कृष्ट बँकर

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikant Das) यांना अमेरिकेच्या ग्लोबल फायनान्स (Global Finance magazine) या मासिकाने जागतिक स्तरावर सर्वोच्च केंद्रीय बँकर (World’s Best Banker) म्हणून स्थान दिले आहे. ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड २०२३ मध्ये दास यांना A+ रेटिंग देण्यात आले आहे. तीन सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरना या यादीत A+ रेटिंग देण्यात आले असून, या यादीत शक्तींत दास पहिल्या स्थानावर आहेत.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या निर्णयांचे संपूर्ण जग कौतुक करत आहे. संकटकाळात त्यांनी ज्या पद्धतीने आर्थिक धोरण स्वीकारले त्याची सर्वत्र कौतूक होत आहे. ग्लोबल फायनान्स मासिकाने एका निवेदनात म्हटले आहे की महागाई नियंत्रण, अर्थव्यवस्थेच्या वाढीचे लक्ष्य, चलन स्थिरता आणि व्याज दर व्यवस्थापनात यश मिळवण्यासाठी ग्रेड A ते ग्रेड F पर्यंत एक स्केल आहे. A ग्रेड A म्हणजे कामगिरी उत्कृष्ट झाली आहे, तर F ग्रेड म्हणजे पूर्ण अपयश.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शक्तिकांत दास यांच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ते सोशल मीडिया अकाउंटवर म्हणाले – आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांचे अभिनंदन. हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे, जो जागतिक स्तरावर आपले आर्थिक नेतृत्व प्रतिबिंबित करतो. शक्तीकांत दास यांचे समर्पण आणि दूरदृष्टी आपल्या देशाच्या विकासाच्या मार्गाला बळकट करत राहील.