क्रिप्टोकरन्सीवर आरबीआय गव्हर्नरांचे मोठे भाष्य

मुंबई : क्रिप्टोकरन्सी हे जुगारीखेरीज दुसरे काहीही नाही आणि त्यांचे कथित मूल्य म्हणजे चुकीचा विश्वास किंवा फसवणूक आहे, असे मोठे विधान रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले आहे. क्रिप्टोकरन्सीवर संपूर्ण बंदी घालण्याच्या आवाहनाचा पुनरुच्चार देखील त्यांनी यावेळी केला. रिझर्व्ह बँकेने अलिकडेच आपली डिजिटल करन्सी बाजारात आणले आहे. हे चलनाप्रमाणेच अधिकृतही आहे.

शुक्रवारी बिझनेस टुडेच्या एका कार्यक्रमात बोलताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी क्रिप्टोवर संपूर्ण बंदी घालण्याच्या त्यांच्या मागणीचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की कोणत्याही मालमत्ता किंवा आर्थिक उत्पादनाचे समर्थन करण्यासाठी मूलभूत मूल्य असते. परंतु क्रिप्टोचे कोणतेही मूळ मूल्य नाही आणि इतकंच नाही तर एक ’ट्यूलिप’ देखील नाही. २० व्या शतकाच्या सुरूवातीला चलन म्हणून युरोप ट्यूलिपची (एक फूल) मागणी वाढली होती. ते मिळवण्यासाठी लोक सर्व प्रकारच्या युक्त्या करत असत.

क्रिप्टोच्या मार्केट प्राईजमध्ये झालेली वाढ ही केवळ फसवणूक आहे किंवा खोटा विश्वास म्हणू शकतो. स्पष्टपणे सांगायचे तर, क्रिप्टो हा फक्त जुगार आहे, असे दास म्हणाले. आपल्या मुद्द्यावर जोर देऊन शक्तीकांत दास पुढे म्हणाले की, आपल्या देशात जुगार खेळण्यास परवानगी नाही. जर तुम्हाला या जुगाराला परवानगी द्यायची असेल, तर याला जुगार समजा आणि जुगाराचे नियम निर्धारित करा. परंतु क्रिप्टो एक फायनॅन्शिअल प्रोडक्ट नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.