आरबीआयचा डिजिटल रुपया १ डिसेंबरपासून उपलब्ध होणार

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) इलेक्ट्रॉनिक चलन ‘डिजिटल रुपया’ १ डिसेंबरपासून येणार आहे. हा डिजिटल रुपया एका डिजिटल टोकनच्या स्वरुपात असेल आणि ते अधिकृत चलन असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या ज्या किमतीच्या नोटा आणि नाणी आहेत, त्याच किमतींमध्ये हे नवे डिजिटल चलन वितरीत करण्यात येणार आहे. हे चलन उपयोगकर्त्यांना डिजिटल वॅलेटच्या स्वरुपात काही निवडक बँकांमधून उपलब्ध होणार आहे.

डिजिटल रुपया डिजिटल स्वरुपातील चलन असून ते आरबीआयकडून वितरीत केले जाणार. ते नेहमीच्या नोटांच्याच किमतीचे असेल. त्याचा उपयोग आर्थिक व्यवहारांसाठी करण्यात येणार. ते डिजिटल टोकनच्या स्वरुपात मिळणार. त्याची साठवणूक मोबाईल केली जाऊ शकणार आहे. गेल्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी डिजिटल रुपया आणला जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता हे चलन बाजारात येत आहे.

हे चलन मोबाईल फोन्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक साधनांमध्ये साठविता येणार आहे. या चलनाचे व्यवहार व्यक्ती ते व्यक्ती आणि व्यक्ती ते व्यापारी अशा दोन्ही प्रकारे करण्यात येऊ शकणार आहेत. व्यापार्‍यांना या चलनातून पैसे द्यायचे असल्यास ते क्यूआर कोडच्या माध्यमातून देता येतील. डिजिटल रुपयामुळे नवी क्रांती होण्याची अपेक्षा आहे.

या चलनाचे वितरण करण्यासाठी केंद्र सरकारने आठ बँकांची निवड प्रारंभ म्हणून केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयीआय बँक, येस बँक आणि आयडीएफसी या चार बँकांमध्ये ते प्रथम उपलब्ध होईल. नंतर बँक ऑफ बरोडा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक या चार बँकांमध्ये ते नंतरच्या टप्प्यात उपलब्ध होणार आहे.