बँक लॉकर घेणार्‍यांसाठी RBI च्या नव्या गाडइडलाइन्स

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १ जानेवारीपासून लॉकरशी संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार, ग्राहक आणि बँकांमधील लॉकर करार १ जानेवारी २०२३ पर्यंत रिन्यूअ करायचे होते. पण आता ग्राहक आणि बँकांमधील लॉकर अ‍ॅग्रीमेंट रिन्यूअ करण्याची अंतिम तारीख आरबीआयने वाढवली आहे. आता ग्राहकांना ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत लॉकर अ‍ॅग्रीमेंट रिन्यूअ करता येणार आहे.

आरबीआयद्वारे ८ ऑगस्ट २०२२ रोजी जारी केलेल्या सुधारित लॉकर करारानुसार, एखाद्याच्या मालमत्तेचे नुकसान झाल्यास, मूल्यातील फरक भरून काढण्यासाठी बँक जबाबदार असेल. ग्राहकांना बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२२ ही ठेवण्यात आली होती, परंतु आता ती ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

आरबीआयने ही मुदत वाढवली आहे. कारण मोठ्या संख्येने ग्राहकांनी सुधारित करारावर १ जानेवारी २०२३ पर्यंत स्वाक्षरी केली नाही, जी कराराच्या रिन्यूअलची अंतिम मुदत होती. आता बँकांना आरबीआयने ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. याव्यतिरिक्त, ग्राहकांना एसएमएस आणि इतर चॅनेलद्वारे लॉकर निर्बंधांमधील बदलांबद्दल माहिती दिली जाईल.