नाशिक : सध्या नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. मात्र कांद्याचे दर गडगडले आहेत. सगळा खर्च जाऊन अक्षरश: हातात दोन आणि चार रुपये येत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज चक्क लासलगावात आंदोलन केलं.
गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात सातत्याने घसरण होत असून यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सकाळी कांद्याचे लिलाव रोखण्यात आले.
दरम्यान, जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी सुमारे २०० क्विंटल कांद्याची आवक झाली. या कांद्याला ४०० ते ८०० रुपये क्विंटल म्हणजे चार ते आठ रुपये किलोपर्यंतचाच भाव मिळाला. यातून कांद्यावर झालेला खर्च आणि वाहतूक खर्चही निघणे कठीण आहे. परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे कांद्यातून चार पैसे हाती येतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. कष्टांनी पिकविलेला कांदा चार ते आठ रुपये किलोने ठोक बाजारात आणून विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून, उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.