खरंच धक्कादायक..!

तरुण भारत लाईव्ह । नागेश दाचेवार।  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. त्याचे नेमके औचित्य काय हे कुणालाही कळले नाही. साधारणतः वर्षोन्वर्षे कुणाला न दिसणारे, कुणाला न भेटणारे, स्वमर्जीशिवाय कोणाशीही न बोलणारे उद्धव ठाकरे यांनी अचानक औचित्यभंग केला, याचा सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. तशी अनेक प्रकरणे न्यायालयात आणि निवडणूक आयोगात सुरू आहेत. दोन सक्षम अशा यंत्रणा आहेत. जो काही निकाल येईल तो ते त्यांच्या मर्यादेत किंबहुना त्यांच्या कार्यकक्षेत आणि कायद्यात, नियमात बसेल अशा पद्धतीने देतील. तो तुम्हाला पटला तर ठीक, नाही पटला तर तुम्ही त्याला आव्हान देऊ शकता. मात्र, आधीच त्या संवैधानिक यंत्रणांना तुम्ही असं केलं पाहिजे आणि तसं केलं पाहिजे असे सल्ले एखाद्या याचिकाकर्त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्याला एकतर बालिशपणा म्हणावा लागेल किंवा मग राजकीय परिपक्वता नसल्याचे म्हणावे लागेल.

Uddhav Thackeray उद्धव ठाकरे हे अधिकृत म्हणा किंवा शिंदे गटाच्या म्हणण्यानुसार अनधिकृत म्हणा पण ते एका पक्षप्रमुख नावाच्या पदावर होते. उद्धव ठाकरे हे मागील काळात अडीच वर्षे भाजपाच्या आणि शिंदे गटाच्या आमदाराच्या म्हणण्यानुसार दगाबाजीने म्हणा नाहीतर दगलबाजीने म्हणा पण राज्याचे मुख्यमंत्री होते. याकाळात ते किती सक्रिय होते, घराबाहेर पडले, नाही पडले किंवा मंत्रालयात आले, नाही आले… हे विषय यातून वेगळेच राहिलेत. पण, उद्धव ठाकरे यांना 29 जून 2022 ला त्यांच्याच आमदारांनी मुख्यमंत्री पदावरून अतिशय अपमानजनक पद्धतीने खाली खेचले आणि 23 जानेवारीपासून उद्धव ठाकरे आपसूकच पक्षाच्या पदावरूनही बेदखल झाले. लोकशाही नसलेल्या पक्षात एकाधिकारशाही गाजवण्याची सवय असलेल्या व्यक्तीला एकामागोमाग एक अनेक धक्के गेल्या सहा महिन्यांत मिळाले. हे सगळं कल्पनाशक्तीच्या बाहेर होतं. असं कसं घडू शकतं यावर आजही उद्धव ठाकरेंचा विश्वास बसलेला नाही. यातून ते सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, वयोमानानुसार शेवटी माणसाच्याही शारीरिक आणि मानसिक मर्यादा आड येतातच. त्यातल्या त्यात Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचा दावा जो राजकीय विश्लेषक करत आहे, तो संजय राऊतला संजय, मिलिंद नार्वेकरला मिलिंद आणि उद्धव ठाकरेंना उद्धव वगैरे एकेरी भाषेत संबोधतो. शिवाय त्यांना अनेकवेळा म्हणजे संजयने, मिलिंदने सांगितले असे कोटदेखील करतो. असा हा ठाकरे परिवाराच्या किचन कॅबिनेटचा भाग असलेल्या नेत्यांची अतिशय जवळीक असल्याचे दाखवणार्‍या या व्यक्तीला कोणी जुना पत्रकार, कोणी त्याला ज्योतिष तर कोणी अभिनेता देखील म्हणतो. जे काही असेल पण जाहीरपणे ठाकरे परिवार आणि मातोश्रीबद्दल नावं घेऊन कोट करून आतली बातमी सांगणार्‍या या व्यक्तीच्या दाव्याला कोणीही खोडलं नाही, हे विशेष. त्यामुळे या दाव्यात तथ्य नाही, असे म्हणायला कुठेही वाव नाही.

त्यामुळे या विश्लेषकाने नुकतेच केलेले दावे हे फार गंभीर आणि धक्कादायक आहेत. विश्लेषकाच्या मते Uddhav Thackeray उद्धव ठाकरे हताश झाले आहेत, हरले आहेत, हत्यार टाकलेले आहेत, तब्येत अतिशय चिंताजनक आहे, त्यांना आता हा व्याप झेपणारा नाही, फार ताण देणे हे त्यांच्या तब्येतीसाठी बरं नाही, ते आता पूर्वीसारखे झंझावाती दौरे करू शकत नाहीत, उद्धव ठाकरे शारीरिक तथा मानसिक रीत्या पहिलेसारखे राहिलेले नाहीत, हे मानण्याची वेळ आता आली आहे. कारण काही झालंच नाही असं दाखविण्यााठी चेहर्‍यावर उसनं अवसान आणणं हे सगळं आता आजूबाजूच्या जवळच्या लोकांना आणि जनतेला जाणवत आहे. यावेळी त्यांच्यातला थकलेपणा, निस्तेजपणा, निसत्त्वपणा हा प्रकर्षाने जाणवत आहे. आजारपणा आणि घडलेल्या घडामोडीनंतर ते खंगलेलेसुद्धा दिसत आहेत. शारीरिक व्याधींसाठी फिजिओथेरपीसुद्धा सुरू आहे. हे सगळे दावे या विश्लेषकाने आपण सहानुभूतीतून आणि त्यांचा समर्थक, चाहता असल्याचे सांगत केलेले आहे. तो विश्लेषक म्हणतो आता उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे प्रमुखपद किंवा जबाबदारी न घेता त्यांनी सल्लागाराची भूमिका घेत बाजूला झालं पाहिजे. हा सगळा गमतीचा भाग नाही. हे फार गंभीर आहे. यातली अजून एक गंभीर बाब म्हणजे आजारपणात अंगावर बसलेला मच्छर कसा मारावा असा प्रश्न माझ्यामोर होता, अशी अवस्था माझी होती, हे जाहीर रीत्या सांगणार्‍या उद्धव ठाकरे यांनी त्याकाळात त्यांची स्वाक्षरी करण्यासाठी माणूस ठेवला होता, असा दावा या विश्लेषकाने केला. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या बनावट स्वाक्षर्‍या या शासकीय कामकाजात मारल्या गेल्या असाच निघतो आणि यापेक्षा गंभीर बाब दुसरी कोणती असू शकत नाही. असं खरंच झालं असेल तर, याची शासकीय स्तरावर न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे आणि लोकशाहीचा असा खेळखंडोबा करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.
बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर त्यांच्या शोकसंदेशावर Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यांनी स्वत: स्वाक्षरी करावी असा आग्रह होता. तेव्हा कसाबसा एकेक शब्द लिहिण्याचा द्राविडीप्राणायाम् त्यावेळी करण्यात आला. इतकी बिकट अवस्था होती. तर मग प्रश्न हा पडतो की, स्वत:च्याने होत नसताना आणि प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने मुख्यमंत्रिपदाचा प्रभार मंत्रिमंडळातील अन्य सहकार्‍याकडे देण्याची कायद्यात तरतूद असताना, उद्धव ठाकरे खुर्चीला का चिकटून बसले होते? एवढंच नाही तर, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा जाहीर केला होता. तो सुद्धा आजपर्यंत दिला नाही. एकीकडे मला खुर्चीचा मोह नाही, खुर्ची नको, हृदयात स्थान द्या म्हणायचे आणि खुर्ची किंवा पद कुठलंही असो त्यावर सोडतो सोडतो सांगून चिकटून बसायचं, एका सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो म्हणायचं आणि दुसरीकडे असले प्रताप करून अवघ्या महाराष्ट्राचं वाटोळं करायचं, ही सगळी नाटकं आता जनतेला चांगल्याने कळून चुकली असल्याने पहिले चार पक्षांच्या संघर्षात चौथ्या आणि आता शिंदे गट आल्यानंतर पाचव्या स्थानावर नेऊन ठेवले आहे जनतेने. मागून पहिला क्रमांक सातत्याने जनता देताना दिसत आहे.