जळगाव । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांचे नाव निश्चित केल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली. मात्र, यानंतर नाट्यमय घडामोडी घडत अध्यक्षपदासाठी बंडखोरीची चर्चा सुरु झाली असून रवींद्र पाटील यांचे नाव निश्चित झाल्यांनंतरही अजून दोन अर्ज दाखल झाले असल्याची कळते.
मागील काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे माजी आमदार गुलाबराव देवकर यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच श्यामकांत सोनवणे यांनी देखील उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागली होती.
अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ऍड रवींद्रभैय्या पाटील, संजय पवार, डॉ.सतीश पाटील व प्रदीप देशमुख यांच्या नावाची चर्चा होती. मात्र राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडखोरीमुळे अध्यक्षपदाच्या नावावरती अद्यापही शिक्कामोर्तब झालेला नाही.
दरम्यान, उपाध्यक्षपदाची देखील निवड केली जाणार आहे. उपाध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटांचे अमोल चिमणराव पाटील यांच्या नावांची चर्चा असून उपाध्यक्ष पदाचे नाव पालकमंत्री व शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्या बैठकीत निश्चित करण्यात येणार असल्याचे समजतेय.