तरुण भारत लाईव्ह न्युज : सहायक प्राध्यापकासाठी पीएच.डी. अनिवार्यतेची अट आता शिथिल आली आहे. या पदासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट), राज्य पात्रता परीक्षा (सेट) उत्तीर्ण एवढीच किमान पात्रता निश्चित करण्यात आली असून, नवे नियम 1 जुलै 2023 पासून लागू असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी नेट, सेटसह पीएच.डी. पदवी अनिवार्य होती. मात्र, यूजीसीने विद्यापीठे आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या नियुक्तीसंदर्भातील 2018च्या नियमावलीमध्ये सुधारणा करून किमान पात्रतेच्या अटी शिथिल केल्या आहेत. त्याबाबतचे राजपत्र यूजीसीकडून प्रसिद्ध करण्यात आले.
नव्या नियमांनुसार सहायक प्राध्यापक पदासाठी पीएच.डी. आता ऐच्छिक करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सहायक प्राध्यापक पदासाठी इच्छुक असलेल्या, पीएच.डी. नसलेल्या नेट-सेटधारक उमेदवारांना दिलासा मिळणार असून, महाविद्यालये, तसेच विद्यापीठांना आवश्यक प्राध्यापक मिळण्यास मोठी मदत होणार आहे.