रेल्वेप्रवाशांना दिलासा : १०० उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या धावणार

तरुण भारत लाईव्ह । ३१ मार्च २०२३। उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये गावी जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे मध्य रेल्वेने पाच मार्गांवर १०० उन्हाळी विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ मार्चपासून या गाड्यांचे आरक्षण खुले होणार आहे.

उन्हाळी सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. त्यासाठी मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी १०० विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ मार्चपासून या गाड्यांचे आरक्षण खुले होणार आहे. पनवेल ते करमाळी (१८ फेऱ्या), पनवेल ते सावंतवाडी (२० फेऱ्या), लोकमान्य टिळक टर्मिनस ते कन्याकुमारी (२० फेऱ्या) पुणे ते सावंतवाडी (२०फेऱ्या) आणि पुणे जंक्शन ते अजनी (२२ फेऱ्या) दरम्यान विशेष फेऱ्या धावणार आहेत.

(०१२१३) पनवेल-करमाळी विशेष पनवेलहून दर सोमवारी रात्री ९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता करमाळीला पोहोचेल. दर मंगळवारी सकाळी ९.२० वाजता (०१२१४) करमाळीहून गाडीचा परतीचा प्रवास सुरू होईल आणि पनवेलला रात्री ८.३० ला संपेल. ३ एप्रिल ते ६ जून या कालावधीत ही गाडी धावणार आहे

(०१२१५) पनवेल ते सावंतवाडी रोड विशेष गाडी ४ एप्रिलपासून दर मंगळवारी रात्री ९.३० ला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठला सावंतवाडी येथे पोहोचेल. (०१२१६) गाडीचा परतीचा प्रवास त्याच दिवशी सकाळी १०.१० ला सुरू होईल आणि रात्री साडेआठला पूर्ण होईल. ४ एप्रिल ते ६ जून या कालावधीत गाडी धावणार आहे.

(०१४६३) लोकमान्य टिळक टर्मिनस ते कन्याकुमारी ही गाडी एलटीटीहून दर गुरुवारी दुपारी ४ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११.२० कन्याकुमारी येथे पोहोचेल. (०१४६४) परतीचा प्रवास दर शनिवारी दुपारी २.१५ ला सुरू होईल आणि एलटीटी येथे रात्री ९ वाजता पोहोचेल. ६ एप्रिल ते ३ जून या कालावधीत गाडी धावणार आहे. उन्हाळी विशेष गाड्यांच्या सविस्तर थांबे आणि अन्य माहितीसाठी मध्य रेल्वेचे संकेतस्थळ पाहावे.