“आदिपुरुषमधील आक्षेपार्ह दृष्ये काढा, अन्यथा कायदेशीर कारवाई करू!”

नवी दिल्ली: ‘आदिपुरुष’ या चित्रपटामध्ये हिंदूंच्या धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावण्यात आल्या आहेत. त्यामधील आक्षेपार्ह दृष्ये हटविण्यात यावीत, अशी मागणी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पत्रकारपरिषदेत मंगळवारी केली आहे.

दिग्दर्शक ओम राउत यांच्या आदिपुरुष या चित्रपटामध्ये रामकथा दाखविण्यात आली आहे. मात्र, चित्रपटाचे टिझर प्रसारित झाल्यानंतर दर्शकांनी चित्रपटावर कठोर टिका करण्यास प्रारंभ केला आहे. सुमार दर्जाचे व्हिएफएक्स तंत्रज्ञान, कलाकारांची चुकलेली निवड आदी मुद्द्यांवरून चित्रपटावर टिका करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे चित्रपटामध्ये हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्याचा आरोप मध्य प्रदेशचे गृहमंतंरी नरोत्तम मिश्रा यांनी केला आहे. ते म्हणाले, मी त्याचा टीझर पाहिला असून त्यात आक्षेपार्ह दृश्ये आहेत. आपल्या श्रद्धा ज्या केंद्रबिंदू आहेत, त्या त्या स्वरूपात दाखवल्या जातात. यामध्ये पात्रांची वस्त्रेदेखील सुसंगत नाहीत. हे धार्मिक श्रद्धेवरचे आक्रमण असून चित्रपटातील दृष्ये भावना दुखावणारी आहेत. अशाप्रकारची आक्षेपार्ह दृष्ये काढून टाकावीत असे पत्र दिग्दर्शक ओम राउत यांना लिहिले आहे. तसे न झाल्यास कायदेशीर कारवाईचाही इशारा मिश्रा यांनी दिला आहे.