व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून काढलं, अ‍ॅडमिनची जीभ कापली

पुणे : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून काढून टाकल्याने एका ग्रुप अ‍ॅडमिनला बेदम मारहाण करत त्याची जीभ कापल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील फुरसुंगीत घडला आहे. सोसायटीतील सदस्यांनी काढलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केल्यावरून बाचाबाची झाल्यानंतर पाच जणांनी ग्रुप अ‍ॅडमिनला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. मारहाणीत या टोळक्याने अ‍ॅडमिनची जीभच कापली गेली आहे. त्यांच्या जीभेला टाके पडले असून, यात ते गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार दाम्पत्य आणि आरोपी एकाच सोसायटीत राहण्यास आहेत. सोसायटीतील रहिवाशी असणार्‍या व्यक्तींचा तक्रारदारांच्या पतीने ओम हाईट्स ऑपरेशन या नावाने व्हॉट्सअप ग्रुप काढला होता. त्यात सर्व सदस्य होते. तक्रारदार यांचे पती या ग्रुपचे अ‍ॅडमिन होते. दरम्यान, त्यांनी या ग्रुपमधून सोसायटीतील एका व्यक्तीला रिमूव्ह केलं. याचा राग आरोपींच्या मनात होता. त्यांनी रिमूव्ह का केले असा मॅसेज तक्रारदारांच्या पतीला व्हॉट्सअपला टाकून विचारणा केली. पण, त्यालाही तक्रारदार यांच्या पतीने उत्तर दिलं नाही.

त्यानंतर त्यांनी तक्रारदारांच्या पतीला फोन करून भेटायचे आहे, असे सांगून भेटण्यास बोलावले. तक्रारदार आणि त्यांचे पती ऑफिसमध्ये असताना आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांनी ग्रुपमधुन मला का काढून टाकल असे विचारणा केली. त्यावेळी ग्रुपमध्ये कोणीही कसलेही मॅसेज करत असल्याने ग्रुपच बंद केला असल्याचं सांगितलं, यावरुन संतापलेल्या पाच जणांनी तक्रारदारांना मारहाण केली. त्यांच्या तोंडावर मारहाण केल्याने तक्रारदारांची जीभ कापली गेली आणि ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या जिभेला टाके पडले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.