नंदुरबार : मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजनेचा कार्यकाळ 31 जानेवारी रोजी संपत आहे. त्यामुळे 11 महिन्यांच्या कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती द्यावी, यांसह विविध मागण्यांसाठी प्रशिक्षणार्थ्यांतर्फे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना निवेदन देण्यात आले.
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात सुरू झालेली मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण ही योजना बेरोजगारी दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरली आहे. योजनेचा कार्यकाळ 31 जानेवारी रोजी संपत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांतर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी नीलेश वसावे, चेतन पावरा, मुकेश वळवी, प्रशांत गोसावी, नरेश राठोड, वृर्पदा खैरनार, दानिएल गावित यांच्यासह अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, शहादा, नंदुरबार आणि नवापूर या तालुक्यांतील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
प्रशिक्षणार्थ्यांची भूमिका
योजनेमुळे रोजगाराची संधी मिळाली असून, मिळालेले मानधन कुटुंबासाठी आणि वैयक्तिक खर्चासाठी मोलाचे ठरले आहे. मात्र, कार्यकाळ संपल्यावर पुन्हा बेरोजगारीचा सामना करावा लागणार असल्याची चिंता व्यक्त करीत, राज्य सरकारने लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
तालुकास्तरावरील सहभाग
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, शहादा, नंदुरबार आणि नवापूर या तालुक्यांतील प्रशिक्षणार्थ्यांनी या मागण्या सादर करीत त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे साकडे घातले आहे.
अशा आहेत प्रमुख मागण्या
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 11 महिन्यांच्या कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती द्यावी. प्रशिक्षण घेतलेल्या शाळांमध्येच पुढील सेवेसाठी नियुक्तीचे आदेश जारी करावेत. निवृत्त शिक्षकांसाठी लागू असलेल्या कंत्राटी सेवा नियमांप्रमाणे वयोमर्यादेशिवाय प्रशिक्षणार्थींना सेवा दिली जावी. येणाऱ्या शासकीय भरती प्रक्रियेत योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी राखीव जागा निश्चित कराव्यात.