रेशिमबाग रामनवमी विशेष
तरुण भारत लाईव्ह । नागपूर : तीन दशकांपूर्वी अयोध्येत रामलीला आपल्या मूळ स्थानी विराजमान होतील का आणि कधी? हा प्रश्न आबालवृद्धांच्या मनात होता. अशा वातावरणात सळसळत्या रक्ताचे युवा कसे मागे राहतील. अयोध्येत पहिल्या आणि दुसऱ्या कारसेवेनंतर, नागपुरातील युवावर्गातही चैतन्य संचारले आणि या ऊर्जेचे रूपांतर रामनवमीच्या उत्सवाची सुरुवात झाली. वर्ष २००३ मध्ये रणजीपटू अमित देशपांडे याच्या पुढाकारातून रेशिमबाग युवा मंडळाच्या वतीने, लहान स्वरूपात या उपक्रमाला सुरुवात झाली. या उपक्रमात अमित देशपांडे, रोशन तांबोळी, स्वप्नील व्यास, लक्ष्मीकांत आराधे, मिलिंद हरदास, चेतन विंचूरकर, संदेश किरडे या सात जणांनी पुढाकार घेत, पदरचे पैसे खर्च करून उत्सवाची सुरुवात केली.
पहिल्या वर्षी, यथाशक्ती योगदान करून केवळ एक टेबल ठेवून ५०० रूपयांचा बुंदी प्रसाद म्हणून वाटली. सात मित्रांपासून सुरू झालेल्या या उपक्रमात आज हजारो लोक जोडले गेले आहेत. उत्सवासाठी पहिल्या वर्षीपासून कृषी उत्पन्न कळमना बाजार समितीचे संचालक अतुल सेनाड यांचे सहकार्य मिळाले आणि रामभक्तीची एक साखळीच तयार झाली. स्थानिक व्यापारी, उद्योजक आणि प्रतिष्ठीत नागरिकांनीही या हौशी पण श्रद्धापूर्ण आयोजनात सहभाग घेतला. कट्टा मित्रांच्या सहज उत्स्फूर्त कल्पनेचे रुपांतर आता मोठ्या उत्सवात झाले आहे. आज पंधरा हजारांवर लोक महाप्रसाद घेतात. सजावट मोठ्या प्रमाणात केली जाते. रामजन्म, स्वरविहार मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात येतो. सायंकाळी आरती होऊन महाप्रसाद वितरण होते.