जालना : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाध्यक्षपद सोडणार्या बाळासाहेब थोरात यांनी आज विधिमंडळ पक्षनेते पदाचा अचानक राजीनामा दिला. विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरुन गोंधळ सुरू झाला. आता या गोंधळावरुन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. त्यामुळेच, हा राजीनामा दिल्याचे बोलले जात होते. आता याप्रकरणी काँग्रेस हायकमांड कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागल्याचे सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी अशोक चव्हाण यांनी आपण पुढाकार घेऊन पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचं म्हटलं आहे.
बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबद्दल आत्ताच कळालं असून थोरात यांचा राजीनामा ही दुर्दैवी बाब आहे. बाळासाहेब हे पक्षाचे वरिष्ठ आणि संयमी नेते आहेत. विशेष म्हणजे आज थोरात यांचा वाढदिवस असून सकाळीच मी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. थोरात यांची मनधरणी करण्यासाठी मी पुढाकार घेईन, काँग्रेस पक्ष वाढीसाठी जे करावं लागेल ते सर्वकाही करणार असल्याचेही अशोक चव्हाण यांनी सांगितले. तसेच, थोरात पक्ष सोडून जाणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी ठामपणे व्यक्त केला. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बाळासाहेब थोरात यांच्याविषयी एक धक्कादायक खुलासा केला. बाळासाहेब थोरातांशी आमचा संपर्क होत नाही, ते आमच्याशी बोलतच नाहीत, असा खुलासा नाना पटोलेंनी केला.