नवी दिल्ली : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) मुळे भविष्यात मोठा धोका देखील निर्माण होऊ शकतो. आतापासूनच कित्येक क्षेत्रातील नोकऱ्या एआयमुळे धोक्यात आल्या आहेत. त्यामुळेच एआयवर निर्बंध लागू करण्यासाठी अमेरिका सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी एका एक्झिक्युटिव्ह ऑर्डरवर स्वाक्षरी केली. यानुसार आता एआयवर निर्बंध लागू करण्याच्या दृष्टीने काही स्टँडर्ड्स तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये लोकांची सुरक्षितता आणि गोपनीयता यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येईल.
काय म्हणाले बायडेन?
“संपूर्ण जगात एआय सुरक्षेबाबत कोणत्याही देशाने केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. येत्या पाच ते दहा वर्षांमध्ये तंत्रज्ञानात एवढे बदल होतील, जे आपण गेल्या 50 वर्षांमध्ये देखील पाहिले नाहीत. आपण सर्व बाजूंनी तंत्रज्ञानाने वेढलेलो आहोत. एआय देखील प्रचंड वेगाने प्रगती करत आहे. यामुळे मोठ्या संधी उपलब्ध होत असल्या, तरी सोबतच याचे बरेच धोके देखील आहेत.” असं जो बायडेन यावेळी म्हणाले.
एआयला रेग्युलेट करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय आपल्याकडे नसल्याचं देखील बायडेन यावेळी म्हणाले. तसंच त्यांनी यावेळी डीपफेकचा देखील उल्लेख केला. “एखाद्या व्यक्तीचा हुबेहुब डुप्लिकेट व्हिडिओ तयार करण्याची क्षमता यामध्ये आहे. मी स्वतःचे व्हिडिओ पाहिले आहेत, ज्यामध्ये मी अशा गोष्टी बोलताना दिसतोय ज्या मी कधीच बोलल्या नाहीत”, असं बायडेन म्हणाले.
बायडेन यांनी दिलेल्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डरनंतर (EO) आता एआय डेव्हलपर्सना आपल्या एआयचे सर्व सुरक्षा चाचण्यांचे निकाल फेडरल गव्हर्नमेंटला द्यावे लागतील. हा नियम डिफेन्स प्रोटेक्शन कायद्याप्रमाणेच असेल. अमेरिका प्रशासन बायोलॉजिकल सिंथेसिस स्क्रीनिंगसाठी काही नियमावली तयार करेल. एआय स्वतःच एखादं बायोलॉजिकल मटेरिअल तयार करू नये, हा यामागचा उद्देश आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीदेखील या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्यांनी एक्स (ट्विटर) पोस्ट करत याबाबात माहिती दिली.