केप कॅनवेरल
NASA: विज्ञानातील काही गोष्टी चमत्कारापेक्षा कमी नाहीत. नासाची व्हॉएजर ही मोहीम यातीलच एक. व्हॉएजर-1 आणि व्हॉएजर-2 या दोन्ही मोहिमांतील यान सूर्यमालेच्याही पलीकडे गेले आहे. यातील व्हॉएजर-2 चा संपर्क काही महिन्यांपूर्वी तुटला होता. जवळपास 19.9 अब्ज किलोमीटर किंवा 12 अब्ज मैल इतक्या अंतरावर असलेल्या या यानाशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्यात नासाला यश आले आहे.
व्हॉएजर-2 ही मोहीम 1977 मध्ये सुरू करण्यात आली. हे यान सध्या सूर्यमालेच्या पलीकडे गेले, पण 21 जुलैला नासाकडून एक चुकीचा संदेश पाठवला गेला. त्यामुळे या यानावरील अँटेना पृथ्वीपासून दोन डिग्रिने दूर गेला. या घटनेमुळे यानातून पृथ्वीकडे पाठवले जाणारे आणि नासाच्या नियंत्रण कक्षातून यानाकडे पाठवले जाणारे सिग्नल बंद झाले.ही परिस्थिती फक्त 15 ऑक्टोबरला सुरळीत होऊ शकणार होती, याचे कारण म्हणजे व्हॉएजर-2 चे स्वयंचलित रिअलाईंनमेंट या दिवशी नियोजित होते.
संशोधकांनी अथक प्रयत्नातून हे यान पुन्हा पूर्वस्थितीत आणले आहे आणि यानाशी संपर्क प्रस्थापित झाला आहे. काही दिवसांपूर्वी यानातून अत्यंत कमी क्षमतेचे तरंग नोंदवता आले होते. याला हार्टबीट असे म्हटले जाते. पृथ्वीवरील डीप स्पेस नेटवर्कवर हे तरंग नोंदवले गेले. मात्र, या तरंगाची क्षमता अत्यंत क्षीण अशी होती.