---Advertisement---
जळगाव : नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी सोमवारी (२२ सप्टेंबर) जळगाव शहरातील रहिवासी असलेले भाविक शिरागड येथे देवीच्या दर्शनासाठी जात होते. या भाविकांचा ममुराबाद गावाजवळ सकाळी ७ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघाताची नोंद तालुका पोलीस स्टेशनला घेण्यात आली आहे.
जळगावातील रामेश्वर कॉलनीतील काही रहिवासी नवरात्रीनिमित्त यावल तालुक्यातील शिरागड येथे दर्शनासाठी रिक्षाने जात होते. त्यांची भरधाव रिक्षा ममुराबादजवळ अचानक पलटी झाली. या अपघातात रिक्षातील ९ भाविकांना जबर मार लागला. काहींना किरकोळ दुखापती झाल्या, तर काहींना गंभीर मार लागला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तात्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी आशा शितोळे (४८), बाळू साबळे (४८), सुलाबाई माळी (६०), मथुराबाई साबळे (७०), ज्योती साबळे (२८), द्वारकाबाई भाऊसाहेब (५०), मंदाबाई साबळे (४८), ओम बाळू साबळे (१९) आणि धनराज माळी (२३) यांचा समावेश आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असून, काहींना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद जळगाव तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
---Advertisement---