पाळधीत कर्फ्यू; ६३ लाखांचे नुकसान, २०-२५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव ।  पाळधी, ता. धरणगाव येथे वाहनाचा कट लागल्यावरून वाद पेटत दंगल होऊन दुकाने व वाहनांची जाळपोळ झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी, ३१ डिसेंबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजता घडली. या दंगलीत एकूण ६३ लाख २८ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, ११ दुकाने आणि ४ वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या प्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात अज्ञात २०-२५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वादातून दंगल आणि जाळपोळ

मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी गावात वाहनाचा कट लागल्यावरून वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर जातीय वादात झाले आणि जमावाने दुकाने, वाहनांवर दगडफेक करून पेटवून दिले. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुकाने आणि वाहनांचे मोठे नुकसान

यासीर अमित देशमुख : मोबाईल दुकानातून १.५ लाखांचे मोबाईल चोरीला.
जावेद पथरू पिंजारी : चप्पल दुकान जळून ८ लाखांचे नुकसान.
शेख हबीब शेख शरीफ : पानसेंटर जळून २.३० लाखांचे नुकसान.
वकार अहमद शेख शकील : घरासमोरील दुचाकी व घराचे ५ हजारांचे नुकसान.
फारुक शेख शरीफ : इलेक्ट्रिक दुकान जळून ५ लाखांचे नुकसान.
एजाज युसूफ देशमुख : ऑटो पार्ट्स दुकानातून ३ लाखांचे साहित्य चोरीला.
दानिश शेख सत्तार : रेफ्रिजरेटर दुकानातील १० लाखांचे नुकसान.
शेख साबीर शेख सादिक : मोबाईल व एलसीडी दुकान २ लाखांचे नुकसान.
अक्रम खान अन्वर खान : अंड्यांचे ४० हजारांचे नुकसान.
रफिक खान अन्वर खान : हातगाडीचे ३ हजारांचे नुकसान.
शेख तसव्वर शेख हमीद : ४ वाहने जळून १० लाखांचे नुकसान.

गुन्हा दाखल, तपास सुरू

या घटनेची फिर्याद जावेद पथरू पिंजारी (वय ४०, रा. बागवान मोहल्ला, पाळधी) यांनी पाळधी पोलीस ठाण्यात दिली. फिर्यादीवरून अज्ञात २० ते २५ जणांविरोधात दंगली, तोडफोड आणि जाळपोळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास धरणगाव पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले करीत आहेत. या घटनेमुळे पाळधी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी सुरक्षेच्या उपाययोजना वाढवल्या आहेत.