धुळे जिल्ह्यात दोन गटात दंगल, सत्तरहून अधिक जणांवर गुन्हा दाखल; सकल हिंदू समाज आक्रमक

धुळे : जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात दंगल उसळल्याची घटना साक्री येथील आंबेडकर चौक परिसर व चांदतारा मोहल्ला भागात घडली. या दंगलीत पाच जण जखमी झाले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला होता. या प्रकरणी सत्तरहून अधिक जणांवर दंगलीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

धुळे जिल्ह्यातील साक्री येथे आंबेडकर चौक परिसर व चांदतारा मोहल्ला भागात दोन गटात 11 जुलै रोजी मागील भांडणाच्या कारणावरून तुफान दंगल उसळली. आंबेडकर चौक परिसरावर मुस्लिम जमावाकडून तुफान दगडफेक करण्यात आली. यानंतर मोठा जमाव एकत्र झाला व दगडफेकीचे रूपांतर दंगलीत झाले. दुसऱ्या बाजूनेही प्रतिकार सुरू झाला. जमावाने तलवार, कोयता, चाकू लाठ्याकाट्यांचा सर्रास वापर करत एकमेकांवर हल्ला चढवला. या दंगलीत पाच जण जखमी झाले आहेत. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला होता. या प्रकरणी सत्तरहून अधिक जणांवर दंगलीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे एप्रिल महिन्यात मशीद समोरून जाताना भीम जयंती मिरवणुकीवर दगडफेक झाली होती. त्यामध्ये अनेक महिला, पुरुष जखमी झाले होते. धुळे जिल्ह्यात दलित समाजावर दगडफेक होण्याची घटना  ही दुसरी आहे.

सकल हिंदू समाजातर्फे पोलिसांना निवेदन !
दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी अन्याय करणाऱ्यांना मोकाट सोडले असून निर्दोष लोकांना मात्र कोठडीत डांबले आहे, असा आरोप करत सकल हिंदू समाजाच्या वतीने साक्री पोलीस ठाण्याचे पीआय हर्षवर्धन गवळी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, या वादाला ज्यांनी सुरुवात केली ते  आरोपी अजूनही मोकाट फिरत आहे. या उलट घटनास्थळी उपस्थित नसलेले जगदीश वाघ, कपिल वाघ, निखिल गोंड, उदय मोरे, यश पाथरे, जय मोरे, अशा अनेक लोकांची नावे खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले आहे.

इतकेच नव्हे तर त्यांना कोठडीत डांबून अन्याय सहन करावा लागत आहे. भांडणातील मास्टरमाइंड आरिफ सर, जाकीर शेख हे मात्र पोलिसांसमोर मोकाट फिरत आहेत. जगदीश वाघ व कपिल वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीमधील एकही आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेला नाही. उलट मुख्य आरोपीने सूडबुद्धीने निर्दोष लोकांची नावे टाकली असून पोलिसांनी शहानिशा न करता अटक केली आहे. यावरून पोलीस एका विशिष्ट धर्मातील लोकांना मदत करत असल्याचे दिसत आहे. तरी निर्दोष लोकांवर गुन्हे मागे घेऊन संबंधित आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांना जेरबंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल व साक्री बंदची हाक देण्यात येईल असा इशारा सकल हिंदू समाजातर्फे देण्यात आला. यावेळी शहरातील हिंदू समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.