छत्रपती संभाजीनगर : रामनवमीच्याआदल्या दिवशी शहरातील किराडपुरा भागात दोन गटात तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र पोलिसांच्या कारवाईनंतर या परिसरात तणावपूर्ण शांतता असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान या सर्व घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
काय म्हणाले फडणवीस?
संभाजीनगरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. आता तिथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु काही लोकं याठिकाणी भडकाऊ प्रतिक्रिया देत असून, परिस्थिती आणखी चिघळली पाहिजे यासाठी प्रयत्न करत असल्याचे फडणवीस म्हणाले आहे. तसेच नेत्यांनी कसं वागलं पाहिजे हे समजावून घ्यावे. कोणीही चुकीचे स्टेटमेंट देऊ नयेत ही जबाबदारी सगळ्या नेत्यांची आहे. तसेच या घटनेला राजकीय रंग देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यापेक्षा दुर्दैव काहीच नाही. काही जण चुकीचे बोलत आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या परिस्थिती निंयत्रणात आहे. परंतु शांतता पाळण्याचा प्रयत्न सर्वांना करावा लागेल. शहर शांत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.