नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकारचा सहभाग असल्याचा आरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडोंच्या भुमिकेमुळे भारत-कॅनडा संबंध ताणले गेले आहेत. खलिस्तानी समर्थकाच्या समर्थनात उतरलेल्या कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. खलिस्तानी समर्थकांची बाजू घेऊन त्यांनी भारतासोबतची मैत्री गमावली असून भारतासोबतच्या वाढत्या संबंधातील तणावाचे पडसाद देशाच्या अर्थव्यवस्थेवर दिसून लागले आहेत.
कॅनडा जगातील दहावी मोठी अर्थव्यवस्था आहे, मात्र ट्रूडोंच्या काळात देशाची आर्थिक स्थिती कमकुवत होत आहे. फक्त शेअर बाजारातच नव्हे तर देशाच्या उत्पादन क्षेत्रातही मंदीची शक्यता आहे. कॅनडाच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीबाबतचे आकडे समोर येऊ लागले आहेत. कॅनडाचा स्टॉक्स टीएसएक्स निर्देशांक नीचांकी पातळीवर आपटला असून यामुळे कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत मंदीचा धोका निर्माण झाला आहे. रॉयटर्सने नुकत्याच आपल्या अहवालात कॅनडाच्या मुख्य स्टॉक इंडेक्सच्या स्थितीबाबत चित्र स्पष्ट केले. अहवालानुसार कॅनडाचे मुख्य स्टॉक एक्सचेंज टोरंटो स्टॉक एक्सचेंज म्हणजेच TSX १.८६% घसरले आहे.
TSX एस अँड पी/TSX संमिश्र निर्देशांक ३६४.०९ अंक घसरून १९,१७७.१८ अंकांवर आला जी गेल्या वर्षभरातील नीचांकी पातळी आहे. सप्टेंबरमध्ये बेंचमार्क निर्देशांकात ३.७% घसरणही झाली. कॅनडातील सर्वात प्रमुख बँक लॉरेन्शियन बँकेचे शेअर्स ५.९% हून अधिक घसरले आहेत. स्प्रंग इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटचे प्रमुख मायकल स्प्रंग यांनी कॅनडासाठी मंदीचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे हे केवळ शेअर बाजारापुरते मर्यादित राहणार नाही. करोनानंतर कॅनडातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रही रुळावर येऊ शकलेले नसून उत्पादन आणि नवीन ऑर्डर या दोन्हींवर परिणाम दिसून येत आहे.
कॅनडाचा जीडीपी घसरतोय
रॉयटर्सने आपल्या अहवालात कॅनडाच्या आरोग्याची संपूर्ण माहिती दिली. अहवालानुसार कॅनडाचा PMI निर्देशांक गेल्या महिन्यात ४७.५ वर घसरला असून कॅनडाच्या जीडीपीत दुसऱ्या तिमाहीत पडझड झाली आहे. देशातील मटेरियल सेक्टर, खाणकाम आणि खते क्षेत्राव्यतिरिक्त सोन्याच्या दरात २.८% पर्यंत घसरण झाली असताना पॉवर सेक्टर आणि युटिलिटी सेक्टर सर्वच खाली पडत आहे.