Big news : नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, ६७७ नागरिकांचे स्थलांतर

मुंबई : राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने कहर  केला आहे. त्यामुळे विविध दुर्घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यात देखील पावसाने सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे. त्यात अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या असून जिल्ह्यातील काळू आणि उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

यामुळे नदी पात्रालगतच्या गावांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून अनेक गावांतील नागरिकांचे बीएसयूपी, म्हाडा कॉलनी, शाळा व समाज मंदिर आदी ठिकाणी जवळपास सहा हजार ६७७ नागरिकांचे स्थलांतर केले होते. गुरुवारी दुपारपर्यंत पाच हजार २१५ कुटुंबे ही त्यांच्या स्वगृही परतली असून अजूनही एक हजार ४६२ नागरिक पर्यायी ठिकाणी वास्तव्यास असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी १४५.७ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यात गुरुवारीदेखील दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, मोहाने आणि जांभूळपाडा या गावांमधून उल्हास नदी वाहते. टिटवाळा गावातून काळू नदी वाहते.