---Advertisement---
धुळे : दोंडाईचा शहरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच दरोडेखोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत एक दरोडेखोर पोलिसांच्या हातून निसटला आहे. पोलिस पथक त्याचा कसून शोध घेत आहे.
दोंडाईचा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांना मिळालेल्या माहितीनुसार, १३ जुलै रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास येथील रेल्वे उड्डाणपुलाखाली दरोडा टाकण्याच्या तयारीत एक टोळी दबा धरून बसली होती.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत शुभम उर्फ बंटी रामोळे (वय १९), सुक्राम गामा मालचे (भिल) (वय २६), भारत सुनील ठाकरे (भिल) (वय २२), राकेश संजय कोळी (वय २७) आणि गोलू जंगा पवार (भिल) (वय २१) या पाच जणांना ताब्यात घेतले. हे सर्व आरोपी दोंडाईचा येथील डाबरी घरकुल परिसरातील रहिवासी आहेत. मात्र, याच वेळी वल्लू नावाचा एक आरोपी (पूर्ण नाव व गाव अज्ञात) पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. अटक केलेल्या दरोडेखोरांकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे.
यामध्ये एक चाकू, लोखंडी टॉमी, लोखंडी सळई, तसेच ५० हजार रुपये किमतीची एमएच-१८ सीए-२०४२ क्रमांकाची दुचाकी आणि दोन मोबाईल फोन यांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ६० हजार १०० रुपये आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राकेश पाटील यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अटकेत असलेल्या पाचही दरोडेखोरांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.