---Advertisement---
जळगाव : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रोहन घुगे यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, डॉ. आयुष प्रसाद यांची बदली नाशिक जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली असून, ते नाशिककडे रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
डॉ. आयुष प्रसाद हे जुलै २०२३ मध्ये जळगाव जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यांनी जिल्ह्यात दाखल होताच अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले. विशेषतः, केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या या ‘केळीनगरी’त शेती, सिंचन आणि बाजारपेठ विकासावर त्यांचा भर होता.
त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने फेब्रुवारी २०२५ मध्ये ‘कार्यालयीन सुधारणा’ विशेष मोहिमेत राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यशाबद्दल प्रसाद यांना विशेष अभिनंदन पत्र देऊन सन्मानित केले होते.
कोण आहेत रोहन घुगे ?
रोहन घुगे हे सध्या ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असून, आता त्यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. घुगे हे २०१८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. जळगाव जिल्हाधिकारीपदी घुगे यांची नियुक्ती ही त्यांच्या अनुभवानुसार असल्याचे शासनाचे म्हणणे आहे.









