म्हणून रोहिणी खडसेंनी चंद्रकांत पाटीलांना पाठवले बदाम ; कारण जाणून घ्या?

जळगाव । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा दिनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण दिले जाईल अशी घोषणा केली होती. परंतु, अद्यापही त्या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या घोषणा लक्षात ठेवण्याची आठवण करून देण्यासाठी बदाम पाठविले आहे.

रोहिणी खडसे म्हणाल्या, “चंद्रकांत दादा, आपण केलेल्या घोषणांची आठवण म्हणून आम्ही तुम्हाला बदाम पाठवीत आहोत. मुलींसाठी मोफत शिक्षणाची जी घोषणा केली आहे ती आठवण व्हावी, यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी आपल्याला बदाम पाठवत आहोत. आपण जी घोषणा केलेली आहे, आता ऍडमिशन सुरू झालेली आहे आणि आमच्या सर्व मुली तुम्ही केलेल्या घोषणांची वाट बघत आहेत.”

मुलींसाठी मोफत शिक्षणाची घोषणा केली असतानाही अद्याप त्या घोषणांची अंमलबजावणी न झाल्यामुळे मुलींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मोफत शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी रोहिणी खडसे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी चंद्रकांत पाटलांना त्यांच्या घोषणांची आठवण करून देत आहेत.

नेमकी काय होती घोषणा?
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण दिले जाईल अशी घोषणा केली होती. ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, त्या मुलींना वैद्यकीय, अभियांत्रिकी, लॉ, असो की महाविद्यालयीन ६६२ व्यवसायीक कोर्सेससाठी कुठलीही फी लागणार नाही, शिक्षण मोफत करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, घोषणेनंतर ४ महिने उलटूनही अद्याप अंमलबजाणवणी करण्यात आली नाही.यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनीही मंत्री चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले आहे.