Video : हिटमॅन फॉर्ममध्ये परतला; विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला धू धू धुतलं

मुंबई : रणजी करंडक स्पर्धेत काल अडखळलेल्या रोहित शर्माने आज आक्रमक अंदाजात पुनरागमन केले. जम्मू-काश्मीरचा गोलंदाज उमर नजीर, ज्याने काल रोहितला केवळ ३ धावांवर बाद केले होते, त्याच्यावर आज रोहितने तुटून पडत एका षटकात ६, ४, ४ असे फटके खेचले. रोहितच्या साथीला असलेल्या यशस्वी जैस्वालनेही भक्कम फटकेबाजी करत नाबाद २३ धावा केल्या.

मुंबईच्या पहिल्या डावात जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले होते. उमर नजीरने भेदक मारा करत रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर यांसारख्या स्टार फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडले. युधवीर सिंगने ४ विकेट्स घेत मुंबईचा पहिला डाव १२० धावांवर गुंडाळला.

जम्मू-काश्मीरच्या फलंदाजांनी पहिल्या डावात २०६ धावा करत ८६ धावांची आघाडी घेतली. शुभम खजुरियाने ७५ चेंडूंत ५३ धावा करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. मोहित अवस्थीने ५ विकेट्स घेत मुंबईला सामन्यात पुनरागमन करून दिले.

दुसऱ्या डावात मुंबईने आक्रमक सुरुवात केली. रोहितने उमर नजीरच्या चेंडूवर पुल शॉटसह मैदानाबाहेर षटकार भिरकावला. नबीच्या गोलंदाजीवर त्याने लांब षटकार मारत प्रेक्षकांची दाद मिळवली. रोहित २८ धावांवर नाबाद असून त्यात ३ षटकार व २ चौकारांचा समावेश आहे. यशस्वीने २३ धावा करत रोहितला भक्कम साथ दिली आहे. मुंबईने १० षटकांत बिनबाद ५२ धावा करत जोरदार पुनरागमन केले आहे.