मुंबई : मराठा व ओबीसी आरक्षणावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात एल्गार सभेत बोलताना तीव्र शब्दांत टीका केली. त्यावेळी सर्वपक्षिय ओबीसी नेते व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र दोनच दिवसात नेत्यांमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येत आहेत.
छगन भुजबळ यांच्यासोबत एल्गार सभेत सहभागी झालेले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी छगन भुजबळांच्या विरोधात भुमिका मांडली आहे. छगन भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नाही. मी माझी स्वतःची आणि पक्षाची भूमिका घेऊन पुढे जाणार आहे. भुजबळांचा पक्ष वेगळा आहे, त्यांचे विचार वेगळे असून भूमिकाही वेगळ्या आहेत. मी ओबीसींसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. परंतु, ते करत असताना इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, अशी आमची भूमिका आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे यांच्याविरोधात आंदोलन करण्यासाठी छगन भुजबळांवर भाजपाचा दबाव असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, या आरोपांवर बोलताना, अशी चर्चा मीही ऐकली आहे. माझ्या कानावर तो विषय आला आहे. विरोधी पक्षनेता असल्यामुळे कोणावरही आरोप करण्यापूर्वी त्यासंदर्भात थोडी अधिक माहिती घेऊ द्या, त्यानंतर यावर बोलेन. मला वाटले की, यामागे कोणाचे तरी अदृष्य हात आहेत तर मग मी त्याचा पडदा टराटरा फाडल्याशिवाय राहणार नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टपणे सांगितले.