बनावट दस्तावेज तयार करुन केला १ कोटींचा अपहार, महसूल सहाय्यकासह एका विरोधात गुन्हा दाखल

---Advertisement---

 

पाचोरा : शेती नावावर नसतांना बनावट दस्तावेज तयार करून १ कोटी २० लक्ष १३ हजार ५१७ रुपयांचा शासकीय रकमेचा अपहार करण्यात आला. याप्रकरणी पाचोरा तहसील कार्यालयातील तत्कालीन महसूल सहायक सह मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी विरोधात तहसीलदार यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, सन 2022 ते सन 2024 पर्यंत अमोल सुरेश भोई यांनी स्वतःचा आर्थिक लाभ होण्याचे दृष्टीकोणातुन गणेश हेमंत चव्हाण याचे संगनमताने 2022-2023 या आर्थिक वर्षामध्ये 122 व 2024-2025 आर्थिक वर्षामध्ये 225 असे एकूण 347 व्यक्तींच्या खात्यावर नैसर्गीक आपत्तीमधिल बाधीत शेती पिकांचे अनुदान देणे, पात्र नसतांना, त्यांच्या नावावर शेती नसतांना, आवश्यक कागदपत्रे न घेता बनावट याद्या तयार करुन राज्य शासनाची, शेतक-यांची, सामान्य जनतेची, प्रशासनाची, अधिकारी व कर्मचा-यांची फसवणुक करुन अशा व्यक्तींना लाभ मिळवून दिला.

जुन ते ऑक्टोंबर 2022 मधिल पंचनाम्यांच्या अभिलेखात खोटे, बनावट शासकिय दस्तऐवज तयार करुन शासकिय कर्मचा-यांच्या बनावट सहया करुन लोकप्रतिनीधींच्या बनावट सहया करुन खोटे दस्तऐवज तयार केले आहे. तसेच तहसिलदार पाचोरा यांचे लॉगीन आय.डी. व पासवर्डचा दुरुपयोग स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी करुन शासकिय संगणकाचा गैरवापर केला आहे.

लाभार्थी यांच्याशी संपर्क साधुन त्यांच्याकडुन त्यांचे खात्यावर जमा झालेली रक्कम स्वतः करीता काढुन घेतलेली आहे. अमोल सुरेश भोई, तत्कालीन महसुल सहायक यांनी बनावट दस्ताचा वापर करुन एकुण 1 कोटी 20 लाख 13 हजार 517 इतक्या शासकीय रकमेचा अपहार केल्याचे निदर्शनास आले आहे.

त्याअनुषंगाने अमोल सुरेश भोई, तत्कालीन महसुल सहायक, पाचोरा व गणेश हेमंत चव्हाण, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी व ज्यांनी ज्यांनी अमोल भोईला आर्थिक अफरातफर करण्यास अनुदानाची शासकिय रक्कम हडप करण्यास मदत केली अशी फिर्याद दाखल केल्याने तत्कालीन महसूल सहायक अमोल सुरेश भोई व मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी गणेश हेमंत चव्हाण, पाचोरा या दोघांविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---