पुणे : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठी ऑनलाइन सोडतीद्वारे निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील एकूण १,०९,०८७ जागांसाठी १,०१,९१६ बालकांची निवड झाली असून, तब्बल ८५,४०६ बालकांचे अर्ज प्रतीक्षा यादीत आहेत.
शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर मोफत शिक्षण मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले होते. यंदा राज्यभरातील ८,८६३ शाळांमध्ये एकूण १,०९,०८७ जागांसाठी ३,०५,१५२ अर्ज आले. या अर्जांमधून १,०१,९१६ बालकांची निवड झाली.
हेही वाचा : मधुचंद्राची रात्र; नववधूनं केलं असं काही की नवऱ्यावर आली रडण्याची वेळ
शुक्रवारी शिक्षण विभागाने ऑनलाइन सोडत जाहीर केली असून, निवड यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश प्रक्रियेची पूर्तता करावी लागणार आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन पोर्टलवर मोठ्या प्रमाणात पालक लॉगिन करत असल्याने सर्व्हर क्षमतेपलीकडे जाऊन मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी घाबरून न जाता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा, असे शिक्षण विभागाने सांगितले आहे.
हेही वाचा : ‘आरबीआय’ने घातली ‘या’ बँकेवर बंदी, आता कोणताही ग्राहक काढू शकणार नाहीत ‘पैसे’
प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे
निवड यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी खालील कागदपत्रांसह संबंधित शाळांमध्ये जाऊन प्रवेश घ्यावा –
अर्ज भरताना नोंदविलेली कागदपत्रे (मूळ आणि साक्षांकित प्रत)
ऑनलाइन अलॉटमेंट लेटर (लॉगिनमधून प्रिंट काढावी)
हमीपत्राची छायांकित प्रत
एसएमएसवर अवलंबून राहू नका, स्वतः तपासणी करा
आरटीई पोर्टलवरील माहितीप्रमाणे, निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएस पाठवले जातील. मात्र, केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता ‘अर्जाची स्थिती’ टॅबमध्ये जाऊन आपला अर्ज क्रमांक टाकून निवड यादीत नाव आहे का, याची खात्री करावी.
प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी पुढील प्रक्रिया
ज्यांचा अर्ज प्रतीक्षा यादीत आहे, त्यांनीही ‘अर्जाची स्थिती’ टॅबमध्ये आपला अर्ज क्रमांक टाकून प्रतीक्षा यादीतील आपला क्रमांक पाहावा. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत प्रवेश घेतल्यानंतर, रिक्त जागांसाठी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना क्रमशः एसएमएसद्वारे कळवले जाईल.
महत्त्वाच्या जिल्ह्यांतील आरटीई प्रवेश आकडेवारी
जिल्हा | शाळांची संख्या | उपलब्ध जागा | आलेल्या अर्जांची संख्या | निवड यादीतील विद्यार्थी |
---|---|---|---|---|
पुणे | 960 | 18,498 | 61,573 | 18,161 |
ठाणे | 627 | 11,322 | 25,774 | 10,429 |
छत्रपती संभाजीनगर | 562 | 4,408 | 16,776 | 4,349 |
नाशिक | 407 | 5,296 | 17,385 | 5,003 |
नागपूर | 646 | 7,005 | 29,913 | 6,912 |
पालकांनी वेळेत प्रवेश प्रक्रियेचे नियोजन करून आवश्यक कागदपत्रांसह शाळांमध्ये संपर्क साधावा, असे शिक्षण विभागाने सांगितले आहे.