आरटीई प्रवेशाची आज पहिली सोडत; जिल्ह्यात ११,२९० विद्यार्थ्यांची नोंदणी

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : आर्थिक व दुर्बल घटकांतील‎ पाल्यांसाठी‎ आरटीई अंतर्गत प्रवेश‎ अर्ज‎ दाखल केल्यानंतर अर्जाची‎ छाननी करण्यात आली. त्यात २७‎ अर्ज बाद करण्यात आले आहेत.‎ आता ३१२२ जागांसाठी बुधवारी‎ सकाळी ११ वाजता ऑनलाइन‎ सोडत निघणार असल्याने‎ विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग होईल.‎

छाननीत एकाच विद्यार्थ्याचे‎ दोनपेक्षा अधिक‎ अर्ज असल्यास‎ एकच अर्ज मंजूर करण्यात आला.‎ संपूर्ण छाननीत २७ विद्यार्थ्यांचे अर्ज‎ बाद झाले. बुधवारी पुणे येथून‎ पहिली ऑनलाइन सोडत निघणार‎ आहे. त्यानुसार इंग्रजी माध्यमाच्या‎ शाळांत‎ प्रवेश दिले जातील.‎‎ जळगाव जिल्ह्यात एकूण २८२‎ आरटीई‎ प्रवेशासाठी संलग्न शाळा‎ आहेत.‎ त्यात ३१२२ एवढी प्रवेश‎ क्षमता आहे.‎ जिल्ह्यात एकूण ११‎ हजार ३१७‎ जणांचे अर्ज दाखल‎ झाले होते. छाननीनंतर या अर्जाची‎ संख्या ११ हजार २९० झाली आहे.‎

चौपट अर्ज

यावर्षी जागांच्या‎ तुलनेत चौपट विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त‎ झाल्याने चुरस बघायला मिळणार‎ आहे. गेल्यावर्षी २८५ शाळांत प्रवेश‎ देण्यात आले होते. तुलनेने यंदा‎ शाळा कमी झाल्या आहेत. तर जागा‎ देखील कमी झाल्या. गेल्यावर्षी‎ ३१४७ जागांसाठी ८३५४ विद्यार्थ्यांनी‎ अर्ज केले होते. यात काही जागा‎ रिक्त राहिल्या होत्या. यंदा अर्ज‎ करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या‎ अधिक व जागा कमी असल्याने‎ जागा रिक्त राहणार नसल्याची‎ शक्यता शिक्षण विभागाने वर्तवली आहे.‎