पुणे : पुणे पोलिसांनी मार्केट यार्ड आणि विमाननगर भागात मोठ्या प्रमाणावर छापेमारी करीत २५ लाख ५१ हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. यामध्ये मेफेड्रोन आणि गांजा समाविष्ट आहेत. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली असून, तीन तस्करांना अटक करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार अमली पदार्थ तस्करीविरुद्ध मोठा पाठलाग सुरू आहे. शुक्रवारी (ता. ३१) पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांचे नेतृत्वाखाली गस्तीवर असलेल्या पथकाला मेफेड्रोन तस्करीची माहिती मिळाली. त्यानुसार, लोहगाव-वाघोली रस्ता परिसरातून कुमेल महम्मद तांबोळी (वय २८, रा. धानोरी) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ८३ ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले, ज्याची किंमत १९ लाख १७ हजार रुपये आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : व्याजाच्या बदल्यात पत्नीकडे शरीरसुखाची मागणी; व्यावसायिकाने संपवले जीवन
विमाननगर भागात दुसऱ्या मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पोलिसांनी किरण भाऊसाहेब तुजारे (वय २४, रा. आव्हाळवाडी, वाघोली) याला अटक केली. त्याच्याकडून ३० ग्रॅम मेफेड्रोन जप्त झाले, ज्याची किंमत ६ लाख २७ हजार रुपये आहे.
तसेच, आनंदनगर-बिबवेवाडी रस्त्यावर सैफन ऊर्फ शफीक इस्माईल शेख (वय ५२, रा. आनंदनगर) याच्याकडून सात हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. याबाबत मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांच्या पथकाची पुढील कारवाई
या कारवाईला गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक आयुक्त गणेश इंगळे आणि राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शन मिळाले. पोलिस निरीक्षक उल्हास कदम, सुदर्शन गायकवाड आणि सहाय्यक निरीक्षक अनिकेत पोटे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली आहे. पोलिसांनी यापूर्वीही अमली पदार्थ तस्करीविरुद्ध कडक कारवाई सुरू केली आहे, आणि यावेळी त्यांना मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले आहे.