तरुण भारत लाईव्ह: प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असताना अनेक भलेबुरे अनुभव गाठीशी येतात. ग्रामीण भागात शिक्षणाची आबाळ असण्याची अनेक कारणे आहेत. गरिबी, पालकांची अनास्था ही त्यापैकी काही कारणे. ग्रामीण मुलांमध्ये शिकण्याचा हुनेर भरपूर असतो. योग्य मार्गदर्शन व संधी मिळाल्यास तिही पुढे जाऊ शकतात, प्रगती करू शकतात. पण अशा हुनेरबाज मुलामुलींच्या शिक्षणात अनेक अडथळे येताना दिसतात, असे माझे निरीक्षण आहे.
अशा गैरहजर, शाळेपासून दुरावलेल्या पाल्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी माझ्यासह अनेक शिक्षक प्रयत्न करत असतात. अशा विद्यार्थ्यांच्या, त्यांच्या पालकांच्या भेटी घेऊन, शिक्षणाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र अशा प्रयत्नांना दाद मिळतेच असे नाही. पालकभेट हा यावरील पारंपरिक उपाय आहे. पण उपायाची ही मात्रा बदलत्या काळात लागू होईलच असे नाही. पालक शिक्षकांना जुजबी उत्तर देऊन परतवून लावतात, असा माझा अनुभव आहे.
गैरहजर मुलांच्या शिक्षणाची मूळ समस्या कायम राहाते. यावर उपाय म्हणून मी ह्याकामी समाजमाध्यमाचा यथोचित उपयोग करून घेण्याचे ठरवले. आजकाल ग्रामीण भागासह सर्वत्र सोशल मीडियाचा बोलबाला आहे. अगदी शिक्षित, अडाणी, गरीब, श्रीमंत सर्वावर सोशल माध्यमाचे गारूड स्वार आहे. जणू ते बदलत्या काळाचे बदलते प्रभावी संपर्क साधन आहे. ह्या संपर्क साधनाचा सगळ्यांवरच प्रभाव आहे, हे जाणून शैक्षणिक समस्या सोडविणे कामी, एक शिक्षक म्हणून मी सोशल मीडियाचा उपयोग करून घेण्याचे ठरविले- त्यातूनच अवतरला छन्नो हा लघुपट!
छन्नोसारखी अनेक मुलंमुली आजही शिक्षण प्रवाहापासून लांब आहेत. अनेक पालक समजत असूनही आपल्या पाल्यांना शेतीकामाला घेऊन जातात. गुरं चारायला, शेळ्या सांभाळायला, लहान भावाबहिणींना सांभाळायला घेऊन जातात. वीटभट्टीवर, ऊसतोडणी, कापूस वेचणी, केळीचे घड वाहायला म्हणूनही पाल्यांना घेऊन जातात. अशा मुलामुलींचे शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहाते. ज्या वयात हसा, खेळायला, फुलायला हवे त्या वयात ही मुलं उन्हा-तान्हात बालमजूर म्हणून राबताना दिसतात. मखमली स्वप्नांसोबतच त्यांचे कोवळे हात पोळून निघतात.
बरं! ह्या बाबतीत पालकांनाही आनंद असतो, असे नाही; तर परिस्थितीपुढे ते हतबल असतात. गरिबीमुळे लाचार बनतात. कळते पण वळत नाही, अशी पालकांची गत होऊन जाते. शिक्षकांनाही ते तशा परिस्थितीची व हतबलतेची जाणिव करून देतात. ऐकून न ऐकल्यासारखे करत सतत वेळ मारून नेण्याच्या प्रयत्नात असतात. अशा पालकांच्या प्रबोधनासाठी मी छन्नो हा लघुपट बनवण्याचा निर्णय घेतला व माझ्या सहकारी शिक्षकांच्या सहकार्यातून व वरिष्ठांच्या मार्गदर्शनातून माझा संकल्प तडीस नेला. मला पूर्ण खात्री आहे, की बदलत्या काळाच्या या माध्यमाचा समाजमनावर योग्य तो परिणाम साधून विद्यार्थांच्या जीवनातील शैक्षणिक अडथळ्यांवर योग्य ती मात केली जाईल!
डॉ.अशोक कोळी
मो.नं . ९४२१५६८४२७