Russia- India: पुतिन यांना मित्र भेटीची उत्सुकता

Russia- India: जगात सध्या अशांतता असूनही, रशियाचे भारत आणि तेथील लोकांसोबतचे संबंध “स्थिरपणे पुढे” जात आहेत. भारतातील पुढील सार्वत्रिक निवडणुकांनंतर ‘कोणतेही राजकीय समीकरणे तयार झाली तरी दोन्ही देश आपले पारंपारिक मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवतील, असं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणाले. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशियाला भेट देण्याचे निमंत्रण दिले. ‘आमचे मित्र’ पंतप्रधान मोदी रशियाला भेट देतील तर तेव्हा आनंद होईल असंही पुतीन म्हणाले.

आज क्रेमलिनमध्ये परराष्ट्र मंत्री ( External Affairs Minister) एस. जयशंकर (s.Jaishankar) आणि पुतीन यांची भेट झाली. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. आम्हाला अतिशय आनंद होत आहे की, जगातील सध्याच्या अशांतता असूनही, आशियातील आमचे पारंपारिक मित्र, भारत आणि भारतीय यांच्याशी संबंध वाढत आहेत. रशियाने युक्रेनवर लष्करी कारवाई करूनही भारत आणि रशियामधील संबंध दृढ झाले असल्याचं पुतीन यांनी एस. जयशंकर यांच्या भेटीदरम्यान सांगितले.
भारताने अद्यापही रशियाने युक्रेनविषयी घेतलेल्या भूमिकेवर निषेध नोंदवलेला नाही. युक्रेन आणि रशियामधील युद्ध हे मुत्सद्दीपणाने आणि संवादाने सोडवले जावे,अशी भूमिका भारताची आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या भेटीच्यावेळी पुतीन यांनी रशिया युक्रेन युद्ध आणि त्यावर भारताची असलेली भूमिका यावरही त्यांनी भाष्य केलं.

आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका जाणून आहोत. आम्ही दोघांनी युक्रेनची स्थिती आणि त्यावरील चिंता आणि जटील प्रक्रियेच्या संबंधावर वारंवार चर्चा केल्याचं ते म्हणाले. मी (पंतप्रधान मोदींना) त्यांना रशिया आणि युक्रेनच्या संघर्षाची स्थितीची माहिती वारंवार दिलीय. ही समस्या शांततेने सोडवण्याठी मोदींची यांची सर्वकाही करण्याची इच्छा आहे, ते मी जाणून आहे. परंतु आम्ही याबद्दल अजून अधिक बोलू आणि आम्ही तुम्हाला या परिस्थितीबद्दल अतिरिक्त माहिती देऊ, असं पुतीन यावेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदींना दिलं भेटीचं निमंत्रण

आमचे मित्र पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) हे रशियाला (Russia) येतील तेव्हा आनंद होईल. आम्हाला सध्याच्या स्थितीविषयी चर्चा करण्यास आणि रशिया आणि भारत संबंधात अजून सुधारणा करण्यासंदर्भात चर्चा करण्यास संधी मिळेल. आम्हाला अनेक पैलूंवर चर्चा करायची आहे. म्हणून मी परराष्ट्र मंत्री (External Affairs Minister) जयशंकर यांना सांगतो, तुम्ही माझ्या सदिच्छा त्यांना द्यावी. तसेच कृपया करून माझं आमंत्रण त्यांना द्यावं. ते आम्हाला भेटायला रशियात येतील, अशी आशा असल्याचं पुतीन जयशंकर यांंना म्हणालेत.

मोदींना दिल्या शुभेच्छा

रशियात पुढील वर्षी राष्ट्राध्यक्षपदासाठी (presidency) निवडणुका (Elections) होणार आहेत. पुतीन पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. भारतातही लोककसभेच्या निवडणुका (Lok Sabha Elections) होणार आहेत. आम्ही भारतातील आमच्या मित्राला यश मिळावं, अशी प्रार्थना करतो. तेथे कोणतेही राजकीय समीकरणं तयार झाली तरी पारंपारिक मैत्रीपूर्ण संबंध कायम असेच राहितील, असं आम्हाला वाटतं असल्याचं पुतीन यावेळी म्हणाले.

दरम्यान जयशंकर यांनी पंतप्रधान मोदींच्या वतीने वैयक्तिकपणे पुतीन यांना शुभेच्छा दिल्या. पुतीन यांना एक पत्रही सुपूर्द केले, ज्यामध्ये मोदींनी भारत-रशिया सहकार्याची स्थिती आणि अलीकडच्या काळातील दोन्ही बाजूंनी केलेल्या प्रगतीबद्दल त्यांचे मत व्यक्त केले आहे.

पंतप्रधान मोदी रशियाला भेट देण्यासाठी उत्सुक: जयशंकर

पंतप्रधान मोदी पुढील वर्षी रशियाला भेट देण्यास उत्सुक असल्याचं जयशंकर यांनी पुतीन यांना सांगितले. “मला खात्री आहे की, आम्ही अशी एक तारीख शोधू जे दोन्ही देशांच्या राजकीय कॅलेंडरसाठी सोयीस्कर असेल. त्यामुळे ही नक्कीच अशी गोष्ट आहे, ज्याची वाट तेही पाहत आहेत, असं जयशंकर म्हणालेत.

 

पुतीन यांनी द्विपक्षीय व्यापार संबंधांवरही चर्चा केली. “आमचा व्यपारी संबंध चांगले होत आमचा व्यापार सलग दुसऱ्या वर्षी आत्मविश्वासाने वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढीचा दरही जास्त आहे. अनेक पाश्चात्य देशांनी आक्षेप घेतल्यानंतरही भारताची रशियातून कच्च्या तेलाची आयात वाढलीय. जयशंकर यांनी पुतीन यांना सांगितले की, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार ५० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे. कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प पुढे नेण्यासाठी भारत आणि रशिया यांच्यात मंगळवारी करार झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

या बैठकीत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह, उपपंतप्रधान आणि व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्यावरील आंतरसरकारी रशियन-भारतीय आयोगाच्या रशियन बाजूचे अध्यक्ष डेनिस मँतुरोव्ह आणि राष्ट्रपतींचे सहाय्यक युरी उशाकोव्ह हे उपस्थित होते.