रशियाचा अध्यक्ष पुतीन की अन्य कोणी? १७ मार्चला ठरणार

मॉस्को – रशियामध्ये पुढील वर्षी होऊ घातलेल्या अध्यक्षीय निवडणुकीची धामधूम आतापासूनच सुरू झाली असून तेथील कायदेमंडळाच्या सदस्यांनी आज मतदानासाठी सतरा मार्च ही तारीख निश्चित केली आहे. विद्यमान अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन हे सलग पाचव्यांदा अध्यक्ष होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

रशियन संसद ड्युमाच्या वरिष्ठ सभागृहातील फेडरेशन कौन्सिल’च्या सदस्यांनी आज एकमताने मतदानाची तारीख निश्चित करण्यासाठी मतदान केले. यामुळे आता प्रचार मोहिमेला सुरुवात होणार आहे. अध्यक्षीय निवडणुकीच्या अनुषंगाने रशियाचा केंद्रीय आयोग हा शुक्रवारी बैठकीचे आयोजन करू शकतो, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली

विद्यमान अध्यक्ष पुतीन (वय ७१) यांनी ही निवडणूक आपण लढविणार नाही असे अद्यापतरी अधिकृतपणे जाहीर केले नसले तरीसुद्धा ते याबाबत लवकरच निर्णय घेऊ शकतात, असेही बोलले जाते. मध्यंतरी पुतीन यांनीच स्वतःची सत्ता कायम राहावी म्हणून राज्यघटनेमध्ये काही सुधारणा घडवून आणल्या होत्या, त्यामुळे त्यांना आणखी प्रत्येकी सहा वर्षांच्या दोन टर्म मिळू शकतात. तसे झाले तर पुतीन हे २०३६ पर्यंत रशियाचे अध्यक्ष राहतील.

व्यवस्थेवर पकड घट्ट

रशियाच्या राजकीय व्यवस्थेवर पुतीन यांची घट्ट पकड असून मार्चमधील निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित मानला जातो. पुतीन यांना आव्हान देणारे त्यांचे बहुतांश प्रतिस्पर्धी हे सध्या तुरुंगात आहेत किंवा त्यातील काहींनी देशाबाहेर पलायन केले आहे. विशेष म्हणजे पुतीन यांच्यावर टीका करणारी स्वतंत्र माध्यमव्यवस्था देखील रशियात शिल्लक राहिलेली नाही.