Murder Case : निर्दयी तरुणाने आईसह चार बहिणींची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाचा असा अंत होणे धक्कादायक असून, या घटनेने सुरक्षा व्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.
लखनौच्या नाका पोलीस स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. अर्शद नावाच्या तरुणाने आपल्या आई आणि चार बहिणींची निर्घृण हत्या केली. एका रात्रीत पाच खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रानुसार, आग्रा येथील बदर नावाचा व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत 30 डिसेंबर रोजी लखनौला आला होता. हॉटेल शरणजीतमध्ये राहण्यासाठी आल्यानंतर त्याच्यासोबत पत्नी अस्मा, मुलगा आणि चार मुली अलशिया (19), रहमीन (18), अक्सा (16) आणि आलिया (9) होत्या. काल रात्री उशिरा बदर आणि त्याचा मुलगा अर्शद यांनी पत्नी आणि चार मुलींची हत्या केली. घटनेनंतर बदर घटनास्थळावरून पसार झाला, तर अर्शद हॉटेलच्या खोलीतच थांबून राहिला.
घटनास्थळी पोलिसांची कारवाई
सकाळी अर्शदने स्वतः हॉटेल कर्मचाऱ्यांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. घाबरलेल्या हॉटेल कर्मचाऱ्यांनी तत्काळ नाका पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन अर्शदला अटक केली. वरिष्ठ अधिकारी, जेसीपी क्राईम, आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी तपास केला. आरोपी अर्शदने गुन्ह्याची कबुली दिली आहे, मात्र या क्रूर कृत्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पित्याचा सहभाग
चौकशीदरम्यान अर्शदने सांगितले की, त्याच्या वडिलांचादेखील या हत्याकांडात सहभाग होता. वडिलांचे लोकेशन विचारले असता, ते आत्महत्या करण्याच्या उद्देशाने हॉटेलमधून निघून गेल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी विशेष पथकांची नेमणूक केली आहे.
हत्येमागील कारण अद्याप अज्ञात
सुरुवातीच्या तपासानुसार, गुंगीचे औषध जेवणात मिसळून नंतर हाताची नस कापणे आणि गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. मात्र, अधिकृत दुजोरा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मिळणार आहे.
राजधानीत चिंता आणि सुरक्षा प्रश्न
एका कुटुंबाचा असा अंत होणे राजधानीसाठी धक्कादायक आहे. या घटनेने लखनौमध्ये सुरक्षा व्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे.