मुंबई : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आपल्या आक्रमक शैलीमुळे जागतिक राजकारणात नेहमीच चर्चेत असतात. आताही त्यांनी असेच वक्तव्य केले आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, “हे अजूनही दुटप्पीपणाचे जग आहे. जे देश प्रभावशाली आहेत ते बदलाला विरोध करत आहेत, तर ऐतिहासिक प्रभाव असलेल्या देशांनी या क्षमतांना शस्त्र बनवले आहे.”
एस जयशंकर रिलायन्स फाऊंडेशन आणि संयुक्त राष्ट्रमधील भारताचे स्थायी मिशन यांच्या सहकार्याने ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनने आयोजित केलेल्या साऊथ राइजिंग: पार्टनरशिप, इन्स्टिट्यूशन्स आणि आयडियाज या मंत्रिस्तरीय सत्राला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी विकसित देशांना खडेबोल सुनावले.
या कार्यक्रमात बोलताना एस जयशंकर म्हणाले की, “बदलासाठी राजकीय इच्छाशक्तीपेक्षा राजकीय दबाव जास्त आहे. जगभरात एक भावना वाढत आहे, आणि ग्लोबल साउथ हे त्याचेच एक प्रतीक आहे, परंतु राजकीय प्रतिकार देखील आहे. प्रभावशाली पदांवर असलेले लोक बदलाच्या आवाजाला विरोध करत आहेत.”
ते पुढे म्हणाले की, “हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सर्वाधिक पाहिले जात आहे. जे आर्थिकदृष्ट्या प्रबळ आहेत ते उत्पादन क्षमतेचा फायदा घेत आहेत. ज्यांच्याकडे संस्थात्मक प्रभाव आहे किंवा ऐतिहासिक प्रभाव आहे त्यांनी प्रत्यक्षात त्यांना शस्त्रही बनवले आहे. कोविड हे त्याचेच उदाहरण आहे.”