नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी निज्जर याच्या हत्येसाठी कॅनडाने भारताला जबाबदार ठरवले आहे. मात्र याचा कोणताही पुरावा अजूनही देऊ ते शकले नाहीयेत. अशावेळी कॅनडाच्या राजकारणात खलिस्थानी गटांचे वर्चस्व असल्याने ते हे आरोप करत आहेत असे म्हटले जात आहे. खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय देत असलेल्या कॅनडाचा खरा चेहेरा जगासमोर आणण्यासाठी भारत सज्ज झाला असून स्वतः परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे बुधवारी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत भाषण करणार आहेत.
यावेळी कॅनडियन पंतप्रधानांनी केलेल्या निज्जर याच्या हत्येसाठी भारतीय एजन्सी जबाबदार आहेत या आरोपांना प्रत्युत्तर देतील असे म्हटले जात आहे. या भाषणामध्ये ते खलिस्तान प्रश्नावरून कॅनडावर शाब्दिक हल्ला चढवू शकतात आणि कशाप्रकारे दहशतवाद्यांचे पालन पोषण कॅनडा करत आहे हे पुराव्यानिशी सांगतील असे म्हटले जात आहे.
दुसरीकडे कॅनडाचे पंतप्रधान हे निज्जर याच्या हत्येत कोण कोणते भारतीय शामिल आहेत हे सांगतील असे म्हटले जात आहे. यामुळे नक्की येत्या काळात काय होते हे पाहणे अतिशय उत्सूकतेचे ठरणार आहे.
कॅनडाने खलिस्तानी घटकांचे पालन-पोषण केल्याचा आरोप भारत अनेक वर्षापासून करत आहे. यातच निज्जर हा एक त्याचं मोठं उदाहरण आहे. 2018 मध्ये भारताने कॅनडाच्या पंतप्रधानांना एक यादी सादर केली होती. भारत विरोधी कारवाया करणाऱ्या घटकांचा उल्लेख त्यात होता. ज्यात निज्जरचा देखील समावेश होता. मात्र कॅनडाने आजपर्यंत कोणावरही कोणतीही कारवाई केलेली नाही.