बारामती : अजित पवार यांनी शरद पवारांविरोधात बंड पुकारल्यानंतर नेमकी कुणाची बाजू घ्यायची ? यावरुन राष्ट्रवादीच्या अनेकांची गोची झाली आहे. राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली असली तरी पवार कुटूंबिय शरद पवारांच्या बाजूने उभे राहिल्याचे दिसून येत आहे. आमदार रोहित पवार यांनी सख्खा काका अजित पवारांविरोधात उघड भुमिका घेतली असतांना आता अजितदादांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनीही अजित पवारांविरोधात भुमिका घेतली आहे.
श्रीनिवास पवार काटेवाडीत गावकऱ्यांसमोर म्हणाले की, मी नेहमी दादांसोबत राहिलो. चांगल्या काळात, वाईट काळात पण मी त्याची साथ दिली. तो म्हणेल तशी मी तिथे उडी मारली. त्याने जे जे निर्णय घेतले त्याला साथ दिली. कधी मी त्याला विचारले नाही की असे का? पण जेव्हा आमची चर्चा झाली. तेव्हा मी त्याला म्हटले आमदारकी तुझ्याकडे आहे तर खासदारकी साहेबांना दिली पाहिजे. त्यांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. साहेबांचे वय आता ८३ झाले, त्यांना सोडणे मला पटले नाह, असे श्रीनिवास पवार म्हणाले.
ज्या काकांनी चारवेळा उपमुख्यमंत्री केले. २५ वर्षे मंत्री केले. तरीसुद्धा म्हणायचे काकांनी माझ्यासाठी काय केले. असा काका मला मिळाला असता तर मी पण खूश झालो असतो. ही भाजपाची चाल आहे. त्यांना शरद पवार यांना संपवायचे होते. इतिहासात तेच झालेय, घरातील व्यक्ती फोडली तर कोणताही माणूस संपविता येतो. कारण घरातलाच घरच्यांना घाबरत नाही. इथून पुढे मी बोलणार आहे, मनमुक्त बोलणार आहे. मी काही लाभार्थी नाही, अशा शब्दांत श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर टीका केली.