धुळे : गणेश वाघ : निजामपूर पोलीस ठाणे हद्दीत चिखलीपाडा येथे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या मेणबत्तीच्या कारखान्यात स्फोटानंतर आग लागल्याने त्यात होरपळून चार महिलांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर होरपळल्या. ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता घडली. या घटनेने धुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेत आशाबाई भैय्या भागवत (34), पूनम भैय्या भागवत (16), सिंधुबाई धुडकू राजपूत (55), नयनाबाई संजय माळी (48) यांचा जागीच मृत्यू झाला तर निकिता सुरेश महाजन व संगीता प्रमोद चव्हाण या गंभीर जखमी असून त्यांना नंदुरबार येथे उपचारार्थ हलवण्यात आले आहे. कारखान्यातील स्फोट प्रकरणी कारखाना मालक जगन्नाथ रघुनाथ कुंवर (वासखेडी) यास निजामपूर पोलिसांनी अटक केली आहे.
अशी घडली घटना
जगन्नाथ कुंवर यांचा निजामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील चिखलीपाडा येथे पत्र्याच्या शेडमध्ये मेणबत्ती बनवण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात वाढदिवसानिमित्त केकवर लावण्यात येणारी आकर्षक मेणबत्ती बनवली जाते मात्र ही मेणबत्ती बनवण्यासाठी स्फोटक दारूचा वापर होत असल्याने मंगळवारी दोन वाजता दारूचा स्फोट झाल्यानंतर कारखान्यात आग लागली. या आगीचे स्वरूप इतके भीषण होते की चारही महिला आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या तर दोघे होरपळल्या. आग लावल्यानंतरही साधनेही या ठिकाणी नसल्याचे दिसून आले तर अग्निशमन दलाला येण्यास अधिक उशीर झाल्याने तो पर्यंत प्राणहानी झाली.
प्रशासन व पोलीस अधिकार्यांची धाव
मेणबत्ती कारखान्यात झालेल्या स्फोटानंतर तहसीलदार आशा गांगुर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, निजामपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल दीपक महाले, पंकज चौधरी, भिका पाटील आदींनी धाव घेतली.
मेणबत्ती कारखान्यात नियम पायदळी
मेणबत्ती कारखान्यात स्फोटक दारू वापरली जात असताना घटनास्थळी अग्निरोधक उपकरणांचा अभाव जाणवला शिवाय अल्पवयीन मुलीही आगीत मयत झाल्याने कारखान्यात अल्पवयीनांना कामावर का ठेवण्यात आले? हा देखील प्रश्न आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड म्हणाले की, पोलिसांकडून या कारखान्याला परवानगी होती वा नाही याबाबत माहिती घेतली जाईल तसेच दोषींवर निश्चित कारवाई होईल. या घटनेत चार महिलांचा मृत्यू झाला असून दोघे होरपळल्याचे त्यांनी सांगितले.
जैताणे गावात पेटल्या नाहीत चुली
जैताणे गावातील महिला या रोजंदारी तत्वावर मेणबत्ती कारखान्यात कामासाठी दररोज जात होत्या. स्थानिक स्तरावर रोजगार मिळत असल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून महिला मेणबत्ती कारखान्यात कामाला होत्या मात्र मंगळवारी होत्याचे नव्हते झाले. मेणबत्ती बनवत असतानाच अचानक स्फोटक दारूचा स्फोट झाल्यानंतर कारखान्यात आग लागली व काही कळण्याआती महिला आगीच्या विळख्यात सापडल्या. पाहता-पाहता सहा महिलांना आगीची झळ बसली. गावापासून काही अंतरावर निर्जनस्थळी कारखाना असल्याने महिलांनी आगीनंतर मोठा टाहो फोडला मात्र दुर्दैवानी त्यांना मदत मिळू न शकल्याने चौघांचा होरपळून मृत्यू झाला तर दोघे गंभीररीत्या भाजल्या. या घटनेने जैताणे गावात चुली पेटल्या नाहीत तर या घटनेनंतर समाजमन हळहळले असून कारखान्यांमधील मजुरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.