Sakshi Malik Retired: डोळ्यात अश्रू..न्याय मिळण्याची आस…ऑलिम्पिक पदकविजेत्या साक्षी मलिकचा कुस्ती सोडण्याचा निर्णय

Sakshi Malik Retired:  रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवडणूकीच्या निकालानंतर भारतीय कुस्तीपटू साक्षी मलिकने मोठी घोषणा केली आहे. तिने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवडणुकीत संजय सिंग यांनी बाजी मारली आहे. हा निकाल समोर येताच साक्षी मलिकला रडु कोसळलं.

ती म्हणाली की,’आम्ही ४० दिवस रस्त्यावर झोपलो. देशभरातील अनेक भागातून लोक आम्हाला समर्थन करण्यासाठी आले. यात वृ्द्ध महिलांचाही समावेश होता. आमच्याकडे असेही लोकं आली ज्यांच्यांकडे खायला आणि कमवायला काहीच नाही. आम्ही जिंकू शकलो नाही,मात्र सर्वांचे आभार.’

 

संजय सिंग बनले रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे नवे अध्यक्ष..

या निवडणूकांपूर्वीच बृचभूषण सिंग यांनी असा दावा केला होता की, संजय सिंग हे रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे पुढील अध्यक्ष असतील. हा दावा आता खरा ठरलाय. संजय सिंग यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी २००८ मध्ये वाराणसी रेसलिंग फेडरेशनचं अध्यक्षपद भूषवलं होतं.

त्यानंतर २००९ मध्ये उत्तर प्रदेशात कुस्ती संघाची घोषणा करण्यात आली त्यावेळी बृजभूषण सिंग यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. तर संजय सिंग यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती

विनेश फोगट भावूक…

साक्षी मलिकने निवृत्तीची घोषणा करताच, विनेश फोगट भावूक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ती म्हणाली की,’ हे खूप दुख:द आहे. आम्ही लढलो, मात्र जिंकू शकलो नाही. मला माहित नाही की आम्हाला न्याय कसा मिळेल. आम्ही न्याय मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. मी युवा खेळाडूंना इतकच सांगेल की,अन्यायाचा सामना करण्यासाठी तयार राहा. कुस्तीचं भविष्य अंधारात आहे,तरी मी आशा करते की, आम्हाला न्याय मिळेल. आम्ही आमचं दु:ख कोणाला सांगाव? आमचा लढा अजुनही सुरुच आहे.