संभाजी भिडेंचं महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान

मुंबई : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते. पण, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडील आहेत, असा खळबळजनक दावाच भिंडेंनी अमरावती दौऱ्यात बोलताना केला. संभाजी भिडेंच्या या वादग्रस्त विधानाचे आज विधानसभेत पडसाद उमटले. विधानसभेत आमदार बाळासाहेब थोरात यांनी संभाजी भिडेंचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

संभाजी भिडे म्हणाले की, मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले असल्याचे सबळ पुरावेही उपलब्ध असल्याचा दावा यावेळी संभाजी भिडेंनी केला आहे.

बाळासाहेब थोरात यांचा संताप

विधानसभेत आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, संभाजी भिडे ही विकृती आहे. त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अवमानकारक विधान केले आहे जे समग्र देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. संभाजी भिडे यांचा हेतू महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा आहे हे ओळखले पाहिजे. कोणाच्या राजकीय फायद्यासाठी ते वारंवार अशी विधाने करतात? आम्ही सभागृहात संभाजी भिडेंवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.