समलिंगी संबंध – विवाहसंस्थेविरूध्द पुकारलेल्या युध्दातील दुसरे पाऊल

2018 मध्ये एका निर्णयात, सर्वोच्च न्यायालयाने ‘समलिंगी संबंधांना’ गुन्हेगारीच्या कक्षेतून बाहेर काढले आणि आता सर्वोच्च न्यायालयात ‘समलिंगी विवाह आणि कायदेशीर मान्यता’ या मुद्द्यावर चर्चा चालू आहे. खरं तर, सध्या माझ्याकडे यावर विचार करायला वेळ नाही. परंतु, समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणे आपल्या समाज रचनेसाठी अत्यंत घातक ठरणार आहे, एवढे नक्की आणि या संदर्भात कुणीतरी ‘आज कुछ तुफानी करते है’ हा महत्त्वाचा मुद्दा मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला आहे की नाही, हे माहिती नाही.

कल्पनाशक्ती हे मानवाला मिळालेले अद्भुत वरदान असले तरीही कल्पनेतील लैंगिक विश्व सत्यात उतरवण्याला मर्यादा असाव्या लागतात. आतापर्यंत, व्यक्तीपेक्षा समाजाला जास्तीचे अधिकार दिले गेलेले होते, त्यामुळे वैयक्तिक अधिकारांवर मर्यादा होती. याचा परिणाम म्हणून काही मानवांची काही बाबतीत कुचंबना होत होती हे खरे आहे. परंतु याउलट, समाज म्हणून समूहाने मान्य केलेल्या मूल्यांचे संरक्षण होत होते. अर्थात, समुहावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार ज्यांना प्राप्त होता अशा राजेशाही वर्गातील पुरूष व स्त्रीया त्यांच्या कल्पनेतील लैंगिक विश्व सत्यात उतरवत असतीलही, परंतु त्यांचे हे विश्व राजवाड्यांच्या बाहेर सहसा कुणाच्याही दृष्टिपथात येत नसे. तसेच, राज्यकर्ते म्हणून टिकून रहाण्यासाठी स्वत:च्या कल्पनेतील सत्यात उतरविलेले लैंगिक विश्व समाजापासून लपवून ठेवत, समूहाने मान्य केलेली मूल्येच मान्य करण्याचा प्रघात राज्यकर्त्यांमध्ये होता. याव्यतिरिक्त, गतकाळातील असंख्य राज्यकर्त्यांपैकी मोजक्याच राज्यकर्त्यांच्या लैंगिक कल्पना समूहाने मान्य केलेल्या मूल्यांच्या कक्षेच्या बाहेर जात असत. त्यामुळे, इतिहासाच्या विस्तृत पटावर ‘सत्यात उतरवल्या गेलेल्या काल्पनिक लैंगिक विश्वाची’ जागा फारच कणभर होती.

वर्तमानात मात्र, समुहाच्या अधिकारांपेक्षा वैयक्तिक अधिकारांना जास्त महत्त्व देणारी सामाजिक संरचना आपण स्वीकारली आहे. त्यामुळे, वैयक्तिक अधिकारांच्या नावाखाली कसल्याही उपटसुंभ मागण्या होत आहेत. अशा वेळी, या मागण्या पूर्ण करू शकणाऱ्या संस्थांनी ‘वैयक्तिक अधिकारांच्या संरक्षणाच्या नावाखाली दीर्घकालीन दुष्परिणामांकडे आपले दुर्लक्ष तर होत नाहीये ना?’ यावर अधिक चिंतन करायला हवे. ‘समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता’ हाच विषय घेतला तरी, अशी मान्यता दिल्यामुळे समाजाचे काय नुकसान व्हायचे ते होवो, परंतु व्यक्तींचे वैयक्तिक नुकसान अधिक होणार आहे, हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. ते कसे? हे आपण पाहू.

सी. डी. प्लेयरवर ब्लू फिल्म बघण्याचा काळ आता इतिहासजमा झालाय आणि स्मार्टफोनच्या शोधामुळे नागडं जग बसल्याजागी उघडं पडलंय. त्यामुळे आजची सत्य परिस्थिती लक्षात घेऊन, स्वत:च्या कल्पनेतील लैंगिक विश्व प्रत्यक्षात साकार करणाऱ्या इतिहासातील मोजक्या राज्यकर्त्यांची व आजच्या कुठल्याही व्यक्तीची तुलना करून बघा. त्या मोजक्या राज्यकर्त्यांनी उभारलेले कुठल्याही, अगदी कुठल्याही प्रकारचे लैंगिक विश्व आज दृकश्राव्य माध्यमातून प्रत्येकाला बघण्यासाठी फुकट उपलब्ध आहे. थोडक्यात, काल्पनिक पातळीवर आज प्रत्येकजण रॉयल होऊ शकत असला तरीही कल्पनेतील लैंगिक विश्व जोपर्यंत सत्यात अनुभवता येत नाही तोपर्यंत, सर्वसामान्यच रहाणार आहे आणि हेच योग्य आहे.

LGBTQ मधील ‘T’ अर्थात Transgender आपण स्विकारलेच आहे आणि ते योग्यही होते. मात्र, लिव्ह इन रिलेशनशिपच्या माध्यमातून, ‘सामाजिकीकरणाकडून वैयक्तिकीकरणाकडे’ आपण पहिले पाऊल टाकले आणि हेच, विवाहसंस्थेविरूध्द पुकारलेल्या युध्दातील पहिले पाऊल होते. ‘L’ आणि ‘G’ अर्थात ‘लेस्बिअन आणि गे’ संबंधांना आपण गुन्हेगारीच्या कक्षेतून बाहेर काढले असून, यासंदर्भात तेवढे पुरेसे आहे. मात्र, ‘समलिंगी संबंधांना विवाह म्हणून कायदेशीर मान्यता’ दिली गेली, तर ते विवाहसंस्थेविरूध्द पुकारलेल्या युध्दातील दुसरे पाऊल ठरणार आहे.

थोडक्यात, आपण स्वत:चे सामाजिक अस्तित्व अगदी कायदेशीररीत्या धुळीस मिळवण्याच्या तयारीत आहोत आणि अर्थातच हे योग्य नाही. कारण, आधी लिव्ह इन संबंध, मग समलिंगी संबंध, त्यापुढे जाऊन उभयलिंगी संबंध, सामुहिक संबंध… ही यादी कधीच पुर्ण होणार नाही‌. लैंगिक स्वैराचाराच्या कल्पनाविलासावर मर्यादा ठेवली नाही, तर हा प्रवास कुठेच थांबणार नाही. कशाकशाला मान्यता देणार? ती सुद्धा कायदेशीर? आणि या असल्या वैयक्तिक अधिकारांमुळे व्यक्तीची उन्नती होईल, असं खुळ कुणाच्या डोक्यात भरलंय? थर्ड जेंडरला अधिकृत मान्यता दिल्यानंतर सिग्नलवरचे तृतीयपंथी अचानक कसे वाढले? त्यातले खरे किती आणि खोटे किती? याचा कुणी अभ्यास केलाय? समलिंगी संबंध अधिकृत केल्यानंतर असे संबंध स्थापित करणाऱ्यांपैकी खरोखरचे समलिंगी किती असतील आणि पोर्नोग्राफीच्या अंमलाखाली ‘आज कुछ तुफानी करते है’ म्हणणारे किती असतील याचा काही विचार? खरंच शारिरीक गरज म्हणून लिंगबदल शस्त्रक्रिया केली जाते की त्यामागे मनाचे खेळ जास्त कारणीभूत असतात, यावर काही मानसशास्त्रीय संशोधन? आणि ते 72 प्रकारचे लिंग (जेंडर) असतात असं म्हणणारे जे आहेत, उद्या चालून त्यांचं काय करणार? एकंदरीत, स्वप्नातले राजे आणि राण्या होऊन कल्पनाशक्तीला भलेही बेसुमार धुमारे फुटू दिले तरी, प्रत्यक्षात आपलं आपलं जेंडर आहे तसंच शाबूत ठेवणं आणि नैसर्गिक कल आहे त्याप्रमाणे वागणं आवश्यक आहे. तसंही, स्वत:च्या शरीराचा कितीही आणि कसाही उपभोग घेतला व घेऊ दिला तरीही वासना कधीच शमत नसते.

बाकी, ‘समलिंगी विवाह’ हा शब्दच मुळात आक्षेपार्ह आहे. कारण, ‘विवाह’ ही संकल्पना मुळात ‘स्त्री व पुरुष’ आजन्म एकत्र येण्याशी संबंधित आहे. त्यामुळे, स्त्री व पुरुष यांच्या व्यतिरिक्त इतर लैंगिक संबंधांना मान्यता द्यावयाची असली तरी, त्यास ‘विवाह’ न म्हणता त्यासाठी एखादा नवा शब्द शोधणे आवश्यक ठरते.

योगेश रंगनाथ निकम
[email protected]
छत्रपती संभाजीनगर
राष्ट्रीय सौर दिनांक: 08 वैशाख 1945
28 एप्रिल 2023